Dilip Mohite Patil  Sarkarnama
पुणे

Dilip Mohite Patil : राजगुरुनगरचा विकास प्रत्यक्षात हाती घेतला असून शहराचा संपूर्ण कायापालट करणार : दिलीप मोहिते पाटील

‘‘एखाद्या जिल्ह्याच्या राजधानीप्रमाणे राजगुरुनगरच्या सर्वांगीण विकासाचे काम हातात घेतले असून, येत्या दोनतीन वर्षांत या शहराचा संपूर्ण कायापालट झालेला जनतेला दिसेल,’’ असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले.

सरकारनामा ब्यूरो

राजगुरुनगर : ‘‘एखाद्या जिल्ह्याच्या राजधानीप्रमाणे राजगुरुनगरच्या सर्वांगीण विकासाचे काम हातात घेतले असून, येत्या दोनतीन वर्षांत या शहराचा संपूर्ण कायापालट झालेला जनतेला दिसेल,’’ असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले.

विधानसभेच्या प्रचारासाठी महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी वाडा रोडच्या आणि तिन्हेवाडी रोडच्या लगतच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी प्रचारफेरी काढली. त्यात नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

‘‘हुतात्मा राजगुरू स्मारक, तालुक्याची प्रशासकीय इमारत, न्यायालयाची नवीन इमारत, कृषी भवन, पोलिस ठाण्याची इमारत, जलतरण तलाव, अनेक पूल आणि रस्ते इत्यादी असंख्य कामे राजगुरुनगर आणि परिसरात फक्त मंजूर नाही तर सुरू आहेत.

येत्या दोनतीन वर्षांत ती पूर्ण होतील. ती पूर्ण होताना आवश्यक निधी पुरवत राहाण्याची आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही माझी आहे. मात्र, त्यासाठी खेडच्या जनतेने घसघशीत मते देऊन मला बळ दिले पाहिजे.

दिशाभूल करणाऱ्या लोकांना फसून विरोधात मते गेली, तर या कामांचा खेळखंडोबा होऊ शकतो. म्हणून विकासाला पाठिंबा देण्यासाठी १०० टक्के मतदारांनी घराबाहेर पडून घड्याळाला मत दिले पाहिजे,’’ असे आवाहन त्यांनी ठिकठिकाणी केले.

चांडोलीकडून हुतात्मा राजगुरू स्मारकाकडे येणारा एक पूल झाला आहे. पोलिस ठाण्याकडून दुसरा पूल होणार आहे. भीमा नदीकाठ विकसित करण्यात येणार आहे. एकंदरीत हुतात्मा राजगुरू वाडा व परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.

बसस्थानकातून राक्षेवाडीकडे जाण्यासाठी पूल झाला आहे, लवकरच त्याला जोडून रस्ता होईल आणि राक्षेवाडीत जाणे सोयीचे होईल. वाडा रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले असून, इतर कामे सुरू आहेत. तिन्हेवाडी रोडवर पोलिस ठाण्याचे काम बरेचसे झाले आहे.

प्रशासकीय इमारत आणि कृषी भवनासाठी निधी मंजूर होऊन भूमिपूजने झाली आहेत. पाबळ रस्त्यावरून थेट गावात राहुल चौकात आणि गढ‌ईवर येण्यासाठी पुलाचे काम झाले असून जोड रस्ते व इतर कामे सुरू आहेत.

न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. अरबुजवाडीतून वडगावला जोडणारा पूल होत आहे. अनेक अंतर्गत रस्त्यांची कामे झाली आहेत व सुरू आहेत. दशक्रिया घाटाच्या विकासासाठी कोटी रुपयांचा निधी दिला असून काम शेवटच्या टप्प्यात आहे. कोट्यवधींचा निधी या शहरासाठी आणला जात आहे, असे मोहिते म्हणाले.

‘‘राजगुरुनगर शहराचा संपूर्ण कायापालट होत आहे. बॉश कंपनीच्या सहकार्याने अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र झाले आहे. पीडीसीसी बँकेच्या इमारतीचे नूतनीकरण झाले आहे. भविष्यात भीमा नदीकाठाचा विकास, कचरा प्रकल्प, स्मशानभूमी विकास, बस स्थानक विकास इत्यादी अनेक विकासकामे पार पाडावयाची आहेत.

विरोधकांनी गप्पांपलीकडे काही केले नाही. एखादा दुसरा प्रकल्प हातात घेतला, त्याचेही वाटोळे करून ठेवले. मी प्रत्यक्षात करून दाखविले आहे आणि भविष्यातही मीच करू शकतो,’’ अशा शब्दांत आत्मविश्वास मोहिते यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT