Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Shivajirao Adhalrao Patil : आढळरावांची लोकसभेची वाट बिकट; मोहितेंनंतर विलास लांडेंचाही विरोध, काय आहे कारण?

उत्तम कुटे

Lok Sabha Election 2024 : शिरूर लोकसभेला महायुतीकडून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी दिली, तर घरी बसेन, असा इशारा खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी नुकताच दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही आढळराव यांना पक्षाने उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केल्याने आढळरावांची वाट आता बिकट झाली आहे. (Shivajirao Adhalrao Patil)

अजितदादांसोबत (Ajit Pawar) असल्याचे दोन्ही पवारांच्या व्यासपीठावर असणाऱ्या लांडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिरूरमधून उमेदवारी पक्षाकडे मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर अजितदादा घेतील तो निर्णय मान्य असेल, असे सांगत आढळरावांना आयात करून त्यांना उमेदवारी देण्याच्या सुरू असलेल्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली. तसेच मला उमेदवारी दिली नाही, तर ती भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगेंना (Mahesh Landge) द्या. त्यांचे काम करण्यास तयार आहे, असेही स्पष्टपणे सांगितले. त्यातून भाचे जावयाला (लांडगे) खासदारकीची संधी देण्यासाठी स्वतःच्या उमेदवारीचा बळी देण्यास ते तयार असल्याचे दिसले.

गतवेळी 2019 ला लोकसभेला शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) विजयी झाले होते. मात्र, भोसरीतून कोल्हेंपेक्षा आढळरावांना अधिक मतदान झाले होते. आता भोसरीच्याच माजी आमदार लांडे यांनीही आता आढळरावांना पक्षाकडून उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केला. परिणामी आढळरावांना (Shivajirao Adhalrao Patil) शिरूरची उमेदवारी मिळण्याची वाट आता आणखी बिकट झाली आहे. त्यांना पक्ष उमेदवारी देणार असल्याच्या चर्चेवर आमच्याकडे नेटवर्क नाही का, आम्ही काहीच कामाचे नाही का, ताकदीचे नाही का, अशी प्रश्नांची सरबत्ती लांडेंनी केली. त्याचवेळी आमदार लांडेंना ती देण्याची तयारी मात्र त्यांनी दाखवली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

आघाडीत स्पष्टता, युतीत सावळागोंधळ

शिरूरमध्ये (Shirur) आघा़डीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी फिक्स आहे, तर आघाडीत ही जागा कोणी लढवायची यावरूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच आणि मोठा गोंधळ आहे. परिणामी त्यांचा उमेदवार ठरलेला नाही. अशीच स्थिती मावळातही दिसून येत आहे. तेथे आपली उमेदवारी स्वत:च जाहीर केलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना युतीतील भाजप आणि राष्ट्रवादीने विरोध केला असून, दावाही ठोकला आहे. त्यामुळे ही जागा युतीत कोण लढणार याविषयी संभ्रम आहे, तर आघाडीकडून तेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव फायनल झाले असून, ते फिरूही लागले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT