सोमेश्वरनगर (जि. पुणे) : उसाचे क्षेत्र वाढत असल्याने विस्तारीकरण करत आहात, ही चांगली बाब आहे. मात्र, विस्तारवाढ करताना कर्ज उभे करावे लागणार आहे. त्यामुळे काही काळ उस दरासाठीचे भांडण टाळा. कर्ज फिटेपर्यंत जपून कारभार करा. कर्जातून बाहेर पडल्यावर वाढलेल्या प्रकल्पांमुळे उत्पन्नवाढीचा फायदा तुम्हालाच मिळणार आहे, असा वडिलकीचा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला. तसेच, इथेनॉलनिर्मितीवर भर द्या, अशी सूचनाही त्यांनी केली, अशी माहिती सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी दिली. (Director of Someshwar Sugar Factory meet to Sharad Pawar)
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाशी पवार यांनी गोविंदबाग (ता. बारामती) निवासस्थानी हितगुज केले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक विश्वास जगताप, संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, प्रणिता खोमणे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पुढील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ३२०० रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थीर राहतील. साखरनिर्मितीसोबत पुढील काळात इथेनॉलकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. विस्तारीकरणाच्या कालावधीत कर्जफेड होईपर्यंत काळजीपूर्वक काम करावे.
कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीराम शेती समूह उभारला असून त्यामार्फत एक डोळा ऊस लागवड पद्धतीचा स्वतःही अवलंब करत आहोत आणि कार्यक्षेत्रातही जागृती करत आहोत, अशी माहिती संचालक सुनील भगत यांनी दिली. यावर पवार यांनी किती फुटांवर लागवड होते, किती उत्पन्न मिळते, याची माहिती घेतली.
संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी, मागील तीन वर्षात एकट्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात १ लाख ३३ हजार टन ऊस जळाला आहे. यामध्ये वीजकंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळाल्याचे प्रमाण बहुतांश असून कंपनी नुकसान भरपाई देत नाही. यास्तव पूर्ण वेळ स्वतंत्र अधिकारी नेमावा, असे निवेदन पवारांना देत चर्चा केली.
सोमेश्वर कारखान्याने मागील हंगामात प्रतिटन ३१०० रूपये इतका चांगला दर दिला, त्यामुळे मला राज्यात इतरत्र गेल्यावर ऊस उत्पादक विचारतात ‘तुमच्या तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याने ३१०० दर कसा काय दिला. आम्हाला का मिळत नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी सोमेश्वरच्या उसदराचे कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.