Rahul Kul
Rahul Kul Sarkarnama
पुणे

थेट पवारांना आव्हान देणाऱ्या राहुल कुलांच्या मंत्रीपदाची दौंडमध्ये चर्चा!

सावता नवले

कुरकुंभ (जि. पुणे) : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. त्यातच शिंदे यांनी भाजपबरोबर जाण्याचे संकेत दिल्याने राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येण्याची चर्चा रंगली आहे. या राजकीय घडामोडीमुळे अनेक आमदारांच्या समर्थकाकंडून आपला नेता आता मंत्री होणार, अशा पोस्ट सोशल मीडियात फिरवल्या जात आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील आणि थेट पवारांना आव्हान देणारे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार, असे त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगत आहेत. कुल यांना मंत्रीपद मिळाल्यास तालुक्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (Discussion of MLA Rahul Kul's ministerial post in Daund taluka)

राज्यात अनेक वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना मंत्रीमंडळात पुणे जिल्ह्यातील अजित पवार, दिलीप वळसे पाटील, काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांनाच नेहमी संधी मिळाल्याने दौंड तालुक्याला मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले. याचे शल्य तालुक्याला आहे. यापूर्वी सुभाष कुल, रंजना कुल यांना मंत्रीपदाची संधी होती. मात्र, बारामतीकरांमुळे ते मिळू शकले नाही, असा आरोप कुलांचे कार्यकर्ते हे करत असतात.

विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले राहुल कुल यांचा अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी पराभव केला. पक्षाचा उमेदवार असतानाही कुलांचा पराभव झाल्याने ते पवारांपासून हळूहळू दुरावत गेले. राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकीत सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार थोरातांना उमेदवारी दिली, त्यामुळे कुलांनी महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी मिळवून पवारांच्या विरोधात दंड थोपटून तालुक्यातील जनतेला स्वाभिमानी दौंडकरची हाक दिली. ही हाक यशस्वी होऊन राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या थोरातांचा पराभव केला.

निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्याने घटकपक्ष रासपचे एकमेव आमदार राहुल कुल यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असं चित्र निर्माण झालं. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी दौंड तालुक्याला लालदिवा मिळणार, असं विधान केल्याने चर्चेला आणखी उधाण आलं. पण मंत्रिमंडळात फक्त जानकर यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला, त्यामुळे तालुक्याला मंत्रीपदाने पुन्हा हुलकावणी दिली. पाच वर्ष मंत्रीपदासाठी अनेक वेळा चर्चा होऊनही ते मिळाले नाही. दरम्यानच्या काळात आमदार राहुल कुल यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवत त्यांचे निकटवर्तीय म्हणून स्थान मिळवलं. त्यामुळे भीमा पाटस साखर कारखान्यासह विविध विकास कामांसाठी निधी मिळविणे व ती मार्गी लावण्यात यश आले.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता येऊन मंत्रीमंडळात स्थान मिळेल, त्यामाध्यमातून अडचणीतील कारखाने व इतर प्रश्न सुटतील, या आशेने कुल यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची हवा असतानाही निसटत्या मतांनी कुल यांनी विजय मिळवला. निवडणुकीत भाजप-शिवसेनेला जास्त जागा मिळाल्याने युतीचे सरकार येऊन जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार म्हणून कुल यांचा समावेश मंत्रीमंडळात निश्चित मानला जात होता. मात्र, अनेक घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्र पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार, अशी चर्चा सुरू असतानाच एकदिवशी पहाटे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा शपथविधी झाला. त्यामुळे दौंडकरांच्या मंत्रीपदाच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अनेक उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि कुल यांची मंत्रीपधाची पुन्हा मावळली.

गेली अडीच वर्ष आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवारांशी जवळीकता ठेवून देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय वर्तुळात राहून कुलांनी तालुक्यातील कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधान परिषद निवडणुकीनंतर पुन्हा भाजप व बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दौंड तालुक्याला कुल यांच्या रूपाने पहिल्यांदा मंत्री मिळेल, या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. आता फक्त प्रतीक्षा, ‘मी राहुल सुभाष कुल, मंत्रीपदाची शपथ घेतो की हे शब्द ऐकण्याची आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस व राहुल कुल यांचे छायाचित्र वापरून लाल दिव्याच्या गाडीला कुणाचं योगदान हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राहुल कुल यांचा मंत्रीमंडळात समावेश नक्की आहे, अशी चर्चा दौंड तालुक्यात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT