Pimpri News : सध्या चांगले चालले आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याचे विभाजन होणार नाही. नवीन जिल्हा निर्मिती होणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जिल्हा निर्मितीच्या चर्चा आणि बातम्यांना गुरुवारी पूर्णविराम दिला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसह महापालिकेतर्फे प्रस्तावित विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मोशी-चिखली प्राधिकरणात झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘मध्यंतरी एक बातमी फिरत होती. की महाराष्ट्रात नवे जिल्हे होणार आहेत.’ तेव्हढ्यात मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडगे यांना बोलण्याचे थांबवत म्हणाले, ‘होणार नाहीत’.
त्यावर पुढे बोलताना लांडगे म्हणाले, ‘जर भविष्यात नवीन जिल्हे करायचे नियोजन असेलच तर, पुण्याचे विभाजन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे नाव नवीन जिल्ह्याला द्या.’ त्यानंतर पवार म्हणाले, ‘जिल्ह्यांचे विभाजन होणार, अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही. कोणत्याही जिल्ह्याचे विभाजन होणार नाही. नवीन जिल्हा होणार नाही.’ हाच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन जिल्हा होणार नाही, असे स्पष्ट केले. ‘आहे ते चांगले सुरू आहे. त्यामुळे कोणताही नवीन जिल्हा होणार नाही.’ अशा शब्दांत त्यांनी नवीन जिल्हा निर्मितीच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.
लांडगे यांच्या वक्तव्यावर पवारांची नाराजी
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसह महापालिकेतर्फे प्रस्तावित विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मोशी-चिखली प्राधिकरणात झाले. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही उपस्थित होते. मात्र, मनोगत व्यक्त करताना भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पवार यांचा नामोल्लेख टाळला. शिवाय, ‘पिंपरी-चिंचवड शहराची खरी ओळख भाऊ (देवेंद्र फडणवीस) तुम्ही पहिल्यांदा २०१४ ला मुख्यमंत्री झालात, त्यानंतर झाली. 2017-18 ला तुम्ही पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय दिले, त्यानंतर शहराची ओळख आणखी वाढली. तेव्हापासूनच महापालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवडचा विकास झाला,’ असा उल्लेख लांडगे यांनी केला.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कामांचा आढावा घेतल्यानंतर ते म्हणाले, ‘महेशला (आमदार महेश लांडगे) काय वाटले माहिती नाही. त्याने माझं नाव घेतलं नाही. पण, संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांना माहिती आहे की, 1992 मध्ये मी पहिल्यांदा खासदार झालो. तेव्हापासून पिंपरी-चिंचवड शहरासाठी काम करत आहे. आपण सर्वजण एकत्र काम करत असताना असे व्हायला नको होते. पण, काम करणाऱ्यांना श्रेय द्या. त्यात कंजुषपणा करू नका.'
पुणे-नाशिक रस्ता रुंदीकरण करताना माउली लांडगेंचे (माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे) यांचे घर पाडावे लागले. विकास करताना माझ्याच माणसांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. पण, शहराच्या विकासासाठी मी तडजोड केली नाही. पिंपरी-चिंचवडचा विकास मीसुद्धा केला आहे, असेही अजितदादा यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.