Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

आमच्या लहानपणी भाऊसाहेबांचा मोठा दरारा असायचा; कुणाचीही जमीन कुणाच्याही नावावर करायचे!

मंगेश कचरे

बारामती : सद्यस्थितीत जमीन ही घराघरांतील वादाचे मूळ ठरत आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत, अशी आमची भूमिका आहे, त्यामुळंच विविध उपक्रम हाती घेतले जात असल्याचे सांगतानाच, बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. (Don't go to court: Ajit Pawar's advice to farmers)

डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज (ता. २ ऑक्टोबर) बारामतीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या घराघरांतील वादाचं मूळ हे जमीन आहे, त्यामुळे जमिनीवरून वाद करत बसू नका. तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. त्यानंतर मात्र तुम्हालाच त्रास होईल, त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका, असा सल्लाही अजित पवार यांनी या वेळी बोलताना शेतकरी कुटुंबांना दिला.

अजित पवार म्हणाले की, आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊसाहेबांचाच थाट असायचा. त्या काळी काहींनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर केल्या आहेत. ही फार पूर्वीची गोष्ट आहे, एवढा त्यांचा दरारा असायचा, असा किस्साही या वेळी अजित पवार यांनी सांगितला. पण, त्यानंतर काळ बदलत गेला, जग बदलत गेले. नवी आव्हाने आपल्यापुढं आली. त्याबाबत जनजागृती आणण्याचे काम करण्यात येत आहे, महसूल विभागात सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय उताऱ्यांसाठी नागरिकांना हेलपाटे मारायला लागू नयेत, असे काम सध्या चालू आहे.

मी ज्यावेळी नागरिकांची निवदने स्वीकारतो, त्यावेळी त्यामध्ये दर आठवड्याला तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासंदर्भातील काम मोठ्या प्रमाणात येतात. जमिनीची मोजणी, रस्ता यासंबंधीचे प्रश्न सोडवून द्या, अशी मागणी त्यातून केली जाते. अनेकदा शेतजमिनीतून वाद होत असतात. ह्या वादातूनच सख्खे शेजारही अनेक वर्ष एकमेकांचं तोंड बघत नाहीत. शेतजमिनीच्या वाटपावरून भाऊभाऊ एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेतात. शेवटी ते कोर्टात जातात. दोन्ही बाजूचे वकील त्यांना सांगत असतात की शंभर टक्के निकाल आपल्या बाजूने लागेल. पण, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, म्हणतात. त्यामुळे मीही सांगतो की बाबानो, कोर्टाची पायरी चढू नका, असे आवाहनही अजित पवार यांनी या वेळी बोलताना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT