Ajit Pawar Sarkarnama
पुणे

गुटखा खाणाऱ्यांची अजितदादांनी धारिवालांसमोरच चंपी केली....

असे सांगताना त्यांनी नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्याकडे तिरका कटाक्ष टाकला

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर नगर परिषदेच्या भव्य आणि आलिशान प्रशासकीय इमारतीचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुटखा व तंबाखू खाऊन कुठेही थुंकणारांना हळूच चिमटे काढले. 'इमारत बघा, कौतुक करा पण चांगले दिसत असताना, इकडे-तिकडे बघत एखाद्या कोपऱ्यात पिचकारी मारू नका', अशा शब्दांत त्यांनी उघड्यावर, इमारतींच्या कोपऱ्यावर थुंकणारांना फटकारले. गुटखा खाऊन जाणाराला इमारतीत प्रवेशच देऊ नका, असे सांगताना त्यांनी नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्याकडे तिरका कटाक्ष टाकला अन त्यांची नजर चुकवताना नकळत धारिवालांचीही जीभ दाताखाली आली! (Don't Permission gutkha eaters to enter Municipal Council office : Ajit Pawar)

शिरूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत उदघाटन सोहळ्यात अजितदादांनी व्यसन करणारांचा शेलक्या शैलीत समाचार घेतला. व्यसन करणारांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे पण काय करणार असे केले की मतांवर परिणाम होतो, अशी टीपण्णी त्यांनी करताच सभास्थानी हशा पिकला. इथे कुठेही थुंकता. माझ्याकडे आले तरी तरी काहीजण तोबरा भरतात आणि हातात उरलेली तंबाखू कुठेही टाकायला कमी करत नाहीत. मात्र, तेच लोक टेक ऑफ घेऊन परदेशात गेले की तेथील शिस्त पाळतात. विमानातून खाली उतरले की काही टाकायचं असेल तर खिशात ठेवतात. मग आपल्या देशात असतानाच अशा टाकाऊ वस्तू खिशात ठेवायला काय होतंय, असा सवाल अजितदादांनी ग्रामीण ढंगात केला.

इकडे असताना पचापच इकडे-तिकडे करायचं आणि परदेशात गेल्यावर नियमाने वागायचं. का तर तिथे शिक्षा होईल. थुंकल्यावर किंवा उघड्यावर काही टाकल्यावर पोलिसांनी पकडलं तर तिथे सोडवायला कुणी येणार नाही, हे आपल्या लोकांना चांगलच माहिती आहे. 'मी १९६७ पासून साहेबांसोबत काम करतोय. तुला राहायचं का पोलिस खात्यात, असा दम आपले लोक आपल्याच पोलिसाला देतात'. परदेशात मात्र कुणाचं काही चालत नाही अन तिथल्या पोलिसांना गावठी दमही देता येत नाही. तिथल्या पोलिसांसारखं आम्हीही जरा कडक वागलं पाहिजे, पण कसं वागणार लगेच मतांवर परिणाम होतो, अशी खंतही पवार यांनी भाषणातून व्यक्त केली.

शिरूर नगर परिषदेने तर नियम करावा आणि सीसीटीव्ही लावून पिचकाऱ्या मारणारांवर लक्ष ठेवावे. इमारतीच्या भिंतीवर थुंकणाराला दहा हजार रूपये दंड ठोका. दुसऱ्यांदा थुंकताना सापडला तर २५ हजार रूपये. बेट्याला झोपच नाही आली पाहिजे. चांगल्या सवयी जोपासा ना, तुम्ही स्वच्छता ठेवली तर चांगले काम करणारांनाही समाधान वाटेल, असा आशावाद ही पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT