Zilla Parishad Teacher Sarkarnama
पुणे

Education Department : शिक्षकांनो लक्ष द्या! प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाचा अल्टिमेटम

Teachers Over Prashast App Training : ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून, जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे १०० टक्के स्क्रीनिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Roshan More

Pune News : विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा आणि शैक्षणिक अडचणी वेळीच ओळखून त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘प्रशस्त अॅप २.०’च्या प्रशिक्षणाकडे शिक्षण विभागाने आता गांभीर्याने लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे १०० टक्के स्क्रीनिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८.८६ टक्के मुख्याध्यापक व शिक्षकांनी ‘प्रशस्त २.०’अंतर्गत १० प्रशिक्षणात्मक व्हिडिओ पाहिले आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या स्क्रीनिंगला गती देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि विशेष शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या स्क्रीनिंगची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १ सप्टेंबर २०२६ पासून विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग सुरू होणार आहे. अॅपचा वापर, स्क्रीनिंगची पद्धत तसेच विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती अचूकपणे भरण्याची प्रक्रिया शिक्षकांना अवगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्क्रीनिंग सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावरच ओळख झाल्यास त्यांच्या गरजेनुसार योग्य शैक्षणिक नियोजन आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्क्रीनिंगची प्रक्रिया केवळ ऑनलाइन नोंदणीपुरती मर्यादित न ठेवता ती गांभीर्याने राबविण्याची गरज आहे.

१० व्हिडिओंसाठी लागणार ५५ मिनिटे

‘प्रशस्त २.०’ अॅपवरील १० प्रशिक्षणात्मक व्हिडिओंचा एकूण कालावधी सुमारे ५५ मिनिटांचा आहे. एका व्हिडिओचा कालावधी साधारण पाच मिनिटांचा असल्याने शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी फार मोठा वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण न करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून, जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे १०० टक्के स्क्रीनिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी ३१ ऑगस्टपर्यंत ‘प्रशस्त २.०’वरील १० प्रशिक्षणात्मक व्हिडिओ पाहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आता शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना ‘प्रशस्त २.०’च्या स्क्रीनिंग मोहिमेला शिक्षक किती प्रतिसाद देतात, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT