Eknath Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar News Sarkarnama
पुणे

Eknath Pawar News : भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या पवारांचा मुख्यमंत्री शिंदे अन् अजितदादांवर हल्लाबोल; पण फडणवीसांना दुखावले नाही

Eknath Pawar press conference : मराठा आरक्षणावरून पक्षाला रामराम ठोकणारे ते भाजपचे पहिले पदाधिकारी ठरले आहेत.

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : महाराष्ट्र सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याच्या निषेधार्थ भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी रविवारी (ता.२२) भाजपला सोडचिठ्ठी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा असूनही आरक्षणासाठी त्यांनी मराठा समाजाला खेळवत ठेवल्याचा गंभीर व सनसनाटी आरोप केला. तो करताना दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कव्हर करीत त्यांना व्हिलन ठरवले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मराठा आरक्षणावरून पक्षाला रामराम ठोकणारे ते भाजपचे पहिले पदाधिकारी ठरले आहेत.

मराठा समाजाचे असूनही शिंदे-पवारांना मराठा आरक्षण देता येत नाही, याची लाज वाटते, अशी जळजळीत टीका एकनाथ पवारांनी यावेळी केली. चाळीस दिवस ते व सरकार काय झोपा काढत होते का, असा संताप त्यांनी मागितलेल्या आणखी मुदतीवर व्यक्त केला. मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीतील दोन दिवस बाकी आहेत, असे सांगत आता, तरी शिंदे-पवारांनी मराठा समाजाची फसवणूक करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या दोन दिवसांत निर्णय घ्यावा, नाहीतर आणखी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला.

गेल्या महिन्यात नऊ तारखेला शहरात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाच्या वेळी आपण राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता, याची एकनाथ पवारांनी आठवण करून दिली. तसेच जातीचा अभिमान असलाच पाहिजे, असे सांगत त्यांनी सर्व राजकीय पक्षातील मराठा पदाधिकारीही आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आता राजीनामा द्यायला सुरूवात करतील, अशी शक्यता वर्तवली. जरागेंच्या रुपाने समाजाला एक चांगला नेता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ पवार हे २२ तारखेला राजीनामा देणार असल्याची बातमी 'सरकारनामा'नेच पहिल्यांदा १३ ऑक्टोबरला दिली होती. ती शंभर टक्के खरी ठरली. आज त्यांनी पिंपरीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून शिंदे-पवारांवर तोफ डागताना दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना, मात्र अलगद टीकेपासून दूर ठेवले. २७ तारखेला आपली राजकीय भूमिका ठरविणार आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यापूर्वीच २५ तारखेला ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. वॉर्ड सरचिटणीस म्हणून काम सुरू करणाऱ्या एकनाथ पवारांना भाजपने प्रदेश प्रवक्तेपदापर्यंत अनेक संधी दिल्या, तरी पक्ष का सोडला असे विचारले असता मी ही पक्षासाठी खूप काही केले व दिले असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT