sanjay raut,  devendra fadnavis
sanjay raut, devendra fadnavis sarkarnama
पुणे

त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री ; शिवसेनेनं डिवचलं

सरकारनामा ब्युरो

पुणे : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली.

या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शपथविधी सोहळ्यात शिंदे समर्थकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. नवे सरकार शनिवारी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करणार आहे.

राज्यातील या सत्तासंघर्षावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप सत्तेत येऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होईल, असे वाटत होते. फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, आणि सरकारवर बाहेरुन माझे लक्ष असेल, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण अचानक दिल्लीहून सूत्र हलली अन् त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावर शिवसेनेनं त्यांना डिवचलं आहे. बंडखोर शिंदे गटासोबत सत्तेत आलेल्या भाजपला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विधानाची आठवण शिवसेनेनं करुन दिली.

एका मताने सरकार कोसळत असतानाही अटलबिहारी विचलित झाले नाहीत. "तोडफोड करून मिळालेल्या बहुमतास मी चिमटय़ानेही शिवणार नाही," असे ते म्हणालेच, पण त्यांनी पुढे जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजप नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले, "मंडी सजी हुई थी, माल भी बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने माल खरीदना पसंद नहीं किया था!" अटलजींचा हा वारसा आता संपला आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

"त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली ? ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे...

कौरवांनी द्रौपदीस भरसभेत उभे करून बेइज्जत केले व धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसेच काहीसे महाराष्ट्रात घडले, पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रूचे, प्रतिष्ठेचे रक्षण केले. जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व महाराष्ट्राची अब्रू लुटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील… नक्कीच!

महाराष्ट्रातील राजकारणात एक सोनेरी पान लिहिले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही काही काळ थांबून लोकशाहीच्या विजयासाठी आकडय़ांचा खेळ करता आला असता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गोंधळ निर्माण करून काही आमदारांचे निलंबन घडवून ते सरकार वाचवू शकले असते, पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही व आपल्या शालीन स्वभावाला साजेशी भूमिका घेतली.

'वर्षा' बंगला तर त्यांनी आधीच सोडला होता. बंगला आपल्याकडेच राहावा म्हणून त्यांनी मिर्ची हवन वगैरे करण्याच्या भानगडी केल्या नाहीत. त्यांनी सामान आवरले व 'मातोश्री'वर पोहोचले. आता मुख्यमंत्रीपद व विधान परिषदेची आमदारकीही त्यागली. शिवसेनेचे पूर्णवेळ कार्य करण्यासाठी ते मोकळे झाले व त्यांनी तसे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी जाता जाता सांगितले की, ''मी सगळय़ांचा आभारी आहे, पण माझ्याच जवळच्या लोकांनी मला दगा दिला.'' ते खरेच आहे.

ज्यांनी दगा दिला ते चोविसेक लोक कालपर्यंत उद्धव ठाकरेंचा 'उदो उदो' करीत होते. यापुढे काही काळ दुसऱयांच्या भजनात दंग होतील. पक्षातून बाहेर पडून दगाबाजी करणाऱया आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई सुरू करताच सर्वोच्च न्यायालयाने ती रोखली व पक्षांतरबंदी कारवाईशिवाय बहुमत चाचणी घ्या, असे सांगितले. राज्यपाल व न्यायालयाने सत्य खुंटीस टांगून ठेवले व निर्णय दिले. त्यामुळे विधिमंडळाच्या भिंतीवर डोके फोडून घेण्यात अर्थ नव्हता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT