Prasad Lad
Prasad Lad  Sarkarnama
पुणे

प्रसाद लाडांशी संबंधित कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याशी संबंधित क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने पुणे महापालिकेच्या (PMC) सुरक्षा विभागात काम करणाऱ्या एक हजार ५८० सुरक्षा कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून वेतन झाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पुणे महाापलिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता (Pune BJP) असताना एक जुलै २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ याकालावधीसाठी सुरक्षा कर्मचारी पुरविण्याचा करार करण्यात आला आहे. या संपूर्ण काळात महापालिकेकडून एक हजार ५८० कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी कंपनीला ४२ कोटी रूपये द्यायचे आहेत. एप्रिल व मार्च या दोन महिन्यांची बिले कंपनीने महापालिकेला दिलेली नाहीत. त्यामुळे महापालिकेला रक्कम अदा करता आली नसल्याचे महाापलिकेतील सूत्रांनी सांगितले.

पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्या काळात या कंपनीकडे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कंत्राट देण्याचा करार करण्यात आला आहे. १४ मार्च २०२२ रोजी भाजपाची पुणे महापालिकेतील सत्ता संपुष्टात आली. कंपनीकडून बिले आली नाहीत त्यामुळे त्याचे पैसे अदा करण्यात आले नाहीत, असे महपालिकेतील सूत्रांनी सांगितले.

तब्बल एक हजार ५८० कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास ही कंपनी असमर्थ ठरली आहे. दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. ही कंपनी आमदार प्रसाद लाड यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असल्याने या संदर्भात आमदार लाड यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT