BJP-NCP
BJP-NCP Sarkarnama
पुणे

सत्ताधारी भाजपासमोर राष्ट्रवादीचे शेवटच्या दिवशीदेखील लोटांगण !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत आज संपली.शेवटच्या दिवशी स्थायी समितीचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी मांडले.तब्बल नऊ हजार ७१६ कोटी रूपयांची तरतूद रासने यांनी अंदाजपत्रकात केली.अंदाजपत्रकावरून न्यायालयात जाण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या प्रभागासाठी भरभक्कम अर्थिक तरतूद करून घेतली.सभागृहाबाहेर कायम विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीने अगदी शेवटच्या दिवशीसुद्धा स्थायी समितीच्या अंदाजपत्रकाला पाठिंबा देत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसमोर लोटांगण घातल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आठ हजार ५९२ रूपयांचे अंदाजपत्रक सात मार्चला मांडले होते. त्यात तब्बल एक हजार १२४ कोटी रूपयांची भर घालत स्थायी समितीचे अध्यक्ष रासने यांनी नऊ हजार ७१६ कोटी रूपयांची तरतूद असलेले अंदाजपत्रक मांडले.तब्बल एक हजार ११२ कोटी रूपयांची भर घालताना रासने यांनी स्थायी समितीच्या सोळा सदस्यांसाठी प्रत्येकी दहा कोटी रूपयांची तरतूद केली आहे.सर्व पक्षांच्या गटनेत्यांना प्रत्येकी आठ कोटी तर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना प्रत्येकी चार कोटींची तरतूद केली आहे. विरोधी नगरसेवकांना प्रत्येकी दोन कोटी रूपयांची तरतूद केली आहे.विशेष म्हणजे भाजपा सोडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांना एकाही रूपयची तरतूद करण्यात आलेली नाही.

महापालिकेची पाच वर्षांची मुदत आज संपली.उद्यापासून महापालिका आयुक्त विक्रमकुमार प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.त्यामुळे आज रासने यांनी सादर केलेले स्थायी समितीचे अंदाजपत्रक प्रत्यक्षात येणार की आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होणार हे येत्याकाही दिवसात स्पष्ट होईल.स्थायी समितीच्या बैठकीत रासने यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समितीच्या काही सदस्यांनी या अंदाजपत्रकाला आक्षेप घेत महाापलिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. मात्र, बहुमताच्यापुढे या सदस्यांचा आवाज क्षीण झाला.परिणामी स्थायीचे अध्यक्ष रासने यांनी सादर केलेले अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

याआधी अनेक विषयात राष्ट्रवादीची महापालिकेत एक आणि महापालिकेबाहेर दुसरीच भूमिका अशी नीती राहिली आहे. यावरून राष्ट्रवादीवर अनेकवेळा टीका झाली आहे.त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी स्थायी समितीच्या अंदाजपत्रकावरून राष्ट्रवादी काही वेगळी भूमिका घेईल, असे सांगण्यात येत होते.मात्र, अंदाजपत्रकाला पाठिबा देत राष्ट्रवादीने भाजपाला एकप्रकारे मदत केल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT