पुणे

काॅंग्रेसचे माजी नगरसेवक सुनील मलके कौमार्य चाचणीवरून वादात

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एकविसाव्या शतकात विद्येच्या माहेरघरात ‘इंग्लड’वरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने जातपंचायतीला शरण येत उच्च शिक्षण घेतलेल्या वधूची कौमार्य परीक्षा घेण्याला संमती दिली. वराचे वडील पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील मलके तर वधूचे वडिल निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. या प्रथेला कडाडून विरोध करणारे कंजारभाट समाजातील व राज्य सरकारमधील अधिकारी कृष्णा इंद्रेकर यांनी वाचा फोडली.
 
राज्य सरकारने जातपंचायतीच्या विरोधात कायदा संमत केला आहे. मात्र, कंजारभाट समाज या कायद्यालाच बगल देत छुप्प्या पद्धतीने जातपंचायती भरवत आहेत. या जातपंचायतीमध्ये विशेषत: विवाहावेळी वधूची कौमार्य परीक्षा घेण्याची कुप्रथा आहे. या कुप्रथेला कंजारभाट समाजातीलच सुशिक्षित युवक-युवतींचा कडाडून विरोध केला जात आहे. कंजारभाट समाजात भारतीय राज्य घटनेप्रमाणे समांतर कायदे आहेत. या कायद्याची अमंलबाजवणी न करणाऱ्यांना वाळीत टाकले जाते.

जातपंचायतीची एवढी दहशत आहे, की पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक व इंग्लडवरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने उच्चशिक्षित असलेल्या वधूची 'कौमार्य' परीक्षा घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

या वधू-वराचा विवाह नुकताच कोरेगाव पार्क येथे संपन्न झाला. कंजारभाट समाजातील जातपंचायतीच्या नियमाप्रमाणे विवाहच्या आधी व नंतर जातपंचायत भरविली जाते. विवाहानंतर वधू-वराला एका अज्ञात ठिकाणी घेऊन जातात. त्यांना मधुचंद्राच्या नावाखाली एका खोलीत बंद केले जाते. त्यानंतर खोली बाहेरच ही जातपंचायती भरविली जाते. त्यानंतर जातपंचायतीमधील सदस्य वराला वधू शुद्ध आहे का अशी विचारणा करते. त्यानंतर वर मधुचंद्राच्या आधी खाटेवर टाकलेले शुभ्र पांढरे कापड दाखवतो. त्यावर रक्ताचे डाग असल्यास वधू शुद्ध असल्याचा निर्णय जातपंचायत देते. जातपंचायतीच्या निर्णयाप्रमाणे वधू शुद्ध नसल्यास ते वधू पित्याला मोठा दंड आकारून विवाहाला मान्यता देतात. त्याला वराची व त्यांच्या नातेवाईकांची संमती असते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT