Shiv Sainiks  Sarkarnama
पुणे

जिल्हाप्रमुख चांदेरेंची शिवसेनेतून हकालपट्टी करा : भोरपाठोपाठ वेल्ह्यातील शिवसैनिकही आक्रमक

जिल्हाप्रमुख चांदेरेंवर आरोप करत वेल्हे तालुक्यातील ३० शिवसैनिकांचे राजीनामे

मनोज कुंभार

वेल्हे (जि. पुणे) : भोर शिवसेनेतील (Shivsena) नाराजीचे लोण शेजारच्या वेल्हे तालुक्यातही पसरले आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणाऱ्या व्यक्तींना संघटनेतील महत्त्वाची पदे दिली जात आहे. मूळ आणि कट्टर शिवसैनिकांना पदापासून डावलले जात आहेत, असा आरोप करत वेल्ह्यातील ३० कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत, अशी माहिती माजी तालुका प्रमुख दत्ता देशमाने आणि उपतालुका प्रमुख अंकुश चोरघे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Expel district chief Balasaheb Chandere from Shiv Sena: Demand of Shiv Sainiks in Velha)

माजी तालुका प्रमुख दत्ता देशमाने आणि उपतालुका प्रमुख अंकुश चोरघे यांनी वेल्हे येथे पत्रकार परिषद घेऊन वरील माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही शिवसेना सोडणार नाही आणि शिवसेनेचे नुकसान करणाऱ्यांनाही सोडणार नाही. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्क प्रमुख सचिन अहिर ह्यांच्यावर नाराज नाही. पक्षाची, प्रामाणिक शिवसैनिकांची खरी परिस्थिती पक्षाला न सांगणाऱ्या स्वार्थी व शिवसेनेच्या हितापेक्षा स्वहिताला महत्व देणाऱ्या गद्दारांच्या विरोधात राजीनामे दिले आहेत. वेल्हा तालुक्यात विकास कामांसाठी विकास निधी मिळावा, अशी आमची प्रामणिक मागणी आहे.

पक्ष नेतृत्वाला आमची विनंती आहे की पक्षविरोधी कामे करणारांना हद्दपार केल्याशिवाय आम्ही पक्षाच्या निवडणुका, आंदोलन यात सक्रिय सहभाग घेणार नाही. वरिष्ठ कोणतीही दखल घेत नाहीत. तसेच नुकत्याच झालेल्या निवडीबाबत शिवसैनिक नाराज असून ३० जणांनी राजीनामे दिले आहेत. अजूनही काही जण राजीनाम्याच्या तयारीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत शिवसैनिकांनी सांगितले की पक्षाशी गद्दारी करणाऱ्या व दुसऱ्या पक्षातून आलेल्या व्यक्तीला जिल्हाप्रमुखपद दिले आहे. ज्यांच्या गावात शिवसेनेची शाखा नाही, त्यांना तालुका प्रमुखपद दिले आहे. या सर्व चुकीच्या नेमणुका झाल्या आहेत. विरोधकांकडून शिवसेना संपवायची सुपारी जिल्हाध्यक्षांनी घेतली आहे का, असा थेट आरोप करत जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी केली. या वेळी माजी तालुका प्रमुख दत्ता देशमाने, उपतालुका प्रमुख, अंकुश चोरघे, तालुका समन्वयक राजेश दामगुडे, विभाग प्रमुख अंकुश दामगुडे, दिनकर पिसे, प्रमोद कुचेकर, जनार्धन कडू आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

यासंदर्भात शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख दीपक दामगुडे म्हणाले की, गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पक्षासाठी केलेल्या कामानुसार वरिष्ठांनी या नियुक्त्या केल्या आहेत. दुसऱ्या पक्षात जाऊन आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे म्हणाले की, वर्तमानपत्रात नावे येण्यासाठी काहीजणांची ही स्टंटबाजी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT