Sunil Shelke
Sunil Shelke sarkarnama
पुणे

देहूच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल फडणवीस आणि भोसलेंनी बदलला...

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendar MOdi) हस्ते उदघाटन झालेला कालचा (ता.१४ जून ) देहू येथील संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) संस्थानच्या शिळा मंदिर उदघाटनाचा कार्यक्रम हा प्रोटोकॉल न पाळल्याने वादग्रस्त ठरला.

त्याला स्थानिक शिवसेनेचे (Shivsena) खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि आमदार राष्ट्रवादीचे (NCP) सुनील शेळके (Sunil Shelke) हे गैरहजर होते. तर, उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू दिले नाही. त्यावर हा प्रोटोकॉल भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी बदलण्याचा उपद्वाप केला, असा हल्लाबोल स्थानिक आमदार मावळचे राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी आज (ता.15 जून) केला. तसेच हा सोहळा भाजप पुरस्कृत होता, असा दावाही त्यांनी केला. (Dehu Latest Marathi News)

देहू संस्थानच्या कालच्या या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. स्थानिक खासदार, आमदार व देहू नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचे नाव व्यासपीठावर बसणाऱ्या व्यक्तींच्या यादीत देहूच्या विश्वस्तांनी देऊनही हा प्रोटोकॉल बदलीत, त्यांना डावलण्यात आले, असा आरोप शेळकेंनी केला. बारणेंनीही हा प्रोटोकॉल बदलल्याने आपण इच्छा असूनही गैरहजर राहिल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना कालच सांगितले होते. तर. आज शेळकेंनी त्यावर पत्रकारपरिषद घेऊन आपली सडेतोड भुमिका मांडली.

हा कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा होता. वारकऱ्यांनाही त्यापासून लांब ठेवून त्यांचा अपमान करण्यात आला. वारकरी संप्रदायाला वेठीस धरण्यात आले. त्यांना सन्मान दिला नाही. त्यातून ते दुखावले गेले. त्यामुळे त्याचा जाहीर निषेध करतो, असे ते यावेळी म्हणाले. देहू संस्थानचे काही विश्वस्त हे राजकारण करीत आहेत, असा आऱोपही त्यांनी केला. पवारांवर बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आचार्य भोसले हे देहूच्या कार्यक्रमाचे प्रमुख असल्याचे समजताच त्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला गालबोट लागणार नाही, याची दक्षताही घेतली. तसेच नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने या दौऱ्यासाठी स्वच्छता करण्याचे काम, मात्र राजकारण बाजूला ठेवून केले, असे त्यांनी स्पष्ट केले.

बदललेल्या प्रोटोकॉलची माहिती पुरेशी अगोदर मिळूनही देवस्थानचे विश्वस्त त्यावर गप्प राहिले, यावर त्यांनी खेद व्य़क्त केला. स्थानिक लोकप्रतिधींना व्यासपीठावर बसविण्याचा व अजितदादांना बोलू देण्याचा आग्रह देवस्थान व त्यांच्या विश्वस्तांनी धरायला हवा होता. कारण ती त्यांची जबाबदारी व अधिकारही होता, असेही ते म्हणाले.

देहू देवस्थानने कालच्या सोहळ्याच्या तयारीसाठी विश्वासात घेतले नसल्याचे शेळकेंनी सांगितले. त्याच्या तयारीच्या बैठकांना त्यांनी बोलावले नाही. मोदींची सभा झालेल्या मंडपाच्या भुमीपूजनापासूनही आम्हाला दूर ठेवण्यात आले. भाजपला त्यांनी पाठीशी घातले ही त्यांची चूक आहे, असे ते म्हणाले. कालचा कार्यक्रम हा भाजप पुरस्कृत होता, हे त्यासाठी झालेला दीड, दोन कोटी रुपयांचा खर्च कोणी केला त्यातून स्पष्ट झाले आहे, असे सूचक विधान त्यांनी केले. या धार्मिक कार्यक्रमात भाजपने राजकारण आणण्याची संकुचित वृत्ती दाखवली, उपमुख्यमंत्र्यांना बोलू दिले नाही. पण, सुर्याला कितीही झाकायचा प्रयत्न केला, तरी तो झाकला जात नाही, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT