Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
पुणे

फडणविसांनी आठ दिवसानंतर अखेर मौन सोडले !

सरकारनामा ब्यूरो

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पहिल्यांदाच माध्यमांसमोर आज भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे सरकार अल्पमतात आल्याचे स्पष्ट करीत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात यावे, अशी विनंती फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्याकडे केली आहे.

२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर रात्री उशीरा फडणवीस यांनी माध्यमांशी संपर्क साधला होता. त्या रात्रीच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह सुरत गाठली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदे यांच्यासह आमदारांनी गुवाहाटीला प्रयाण केले. गेले सात दिवस एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आमदार गुवाहाटीत आहेत. या सात दिवसात अनेक घडामोडी घडल्या. आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा भाजपातील एकाही नेत्याने भूमिका मांडली नाही.

राजकीय घडामोडींबाबत एकाही शब्दाने फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. मात्र, पडद्यामागे सारी तयारी सुरू होती. या सात दिवसात फडणवीस तब्बल पाचवेळा दिल्लीला जाऊन आले.पक्षाचे नेते, कायदेशीर सल्ला या साऱ्या मसलती या काळात फडणवीस यांच्याकडून सुरू होत्या. आजदेखील फडणवीस दिवसभर दिल्लीत होते. दिल्लीतील भेटीगाठी उरकून सायंकाळी ते मुंबईत पोचले. त्यानंतर पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी राजभवन गाठले. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणारे पत्र दिले.

राज्यपाल कोश्‍यारी यांना भारतीय जनता पार्टीच्यावतीने पत्र देण्यात आले. आता या संदर्भात राज्यपाल कोश्‍यारी कायदेशीर सल्ला घेऊन राज्य सरकारला अधिवेशन घेण्याबाबत सूचना देतील. त्यानंतर राज्य सरकारला राज्यपालांच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. न्यायालय काय निर्णय देते त्यावर विश्‍वासदर्शक ठरावाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT