Maval Farmers Sarkarnama
पुणे

कृषीपंप वीजजोड तोडल्याने शेतकरी आक्रमक; पुणे-मुंबई महामार्ग रोखला..

राज्य सरकारने (Mahavikas Aghadi Government) कृषीपंपाची वीज तोडून खाजगी सावकरासारखे शेतकऱ्यांशी वागू नये, असा इशारा भाजप नेते बाळा भेगडेंनी (Bala Bhegade) यावेळी दिला.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : हजारो कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक स्थिती बिकट झालेल्या महावितरणने (Mahavitaran) आता एक महिन्याचे बीज भरले नाही, तरी वीजपुरवठा खंडीत करण्याची धडक मोहीम सुरु केली आहे. त्यात आतापर्यंत नऊ हजार कोटी रुपये थकबाकी असलेल्या ३२ लाख बिगरशेती ग्राहकांचा वीजजोड कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. या कारवाईत मावळातील चार हजार शेतीपंपाचीही वीजजोडणी गेल्या आठ दिवसांत तोडण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी (Farmers) मावळचे माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा बुधवारी (ता.२ मार्च) नेला. त्यानंतर त्यांनी पुणे-मुंबई महामार्ग (Pune-Mumbai highway) अर्धा तास रोखून धरला होता.

वडगाव चौकात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. राज्य सरकारने कृषीपंपाची वीज तोडून खाजगी सावकरासारखे शेतकऱ्यांशी वागू नये, असा इशारा भेगडेंनी यावेळी दिला. लाखो रुपयांची बिले देण्यात आल्याने ती भरायची कशी?, अशी विचारणा शेतकऱ्यांनी यावेळी केली. ती प्रथम दुरुस्त करून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, लाखातील बिले एकदम भरणे शक्य नसल्याने टप्याटप्याने भरण्याची मुदत मागण्यात आली. ती महावितरणचे स्थानिक अधिकारी सूर्यवंशी यांनी मान्य केली. चार हजार शेतीपंपासह चाळीस लघुउद्योगांचाही वीज थकित बिलापोटी मावळात खंडीत करण्यात आली आहे.

राज्यातील तीन कोटी ग्राहकांपैकी ३२ लाख १६ हजार पाचशे बिगरशेती ग्राहकांनी नऊ हजार ३५४ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याजोडीने आता एक महिन्याचेही बिल न भरणाऱ्यांची वीज तोडली जात आहे. अशी वीज खंडित केलेल्या ग्राहकांना वीज देणाऱ्या शेजाऱ्यांविरुद्धही कारवाईचा बडगा महावितरणने आता उगारला आहे. दरम्यान, कायमस्वरुपी वीज तोडलेल्या ग्राहकांसाठी आता माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या नावाने अभय योजना राज्य वीज कंपनीने सुरु केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT