HSC Board Pune
HSC Board Pune Sarkarnama
पुणे

Maharashtra Board HSC Result : असाही योगायोग ! वडिलांनीच जाहीर केला मुलीचा बारावीचा निकाल; असं काय झालं ?

मीनाक्षी गुरव

Maharashtra Board HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी (ता. २५ मे) जाहीर केला. यात ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा ९६ टक्के सर्वाधिक, तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी निकाल लागला आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ इतकी आहे.

दरम्यान, बारावीच्या परीक्षेच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुली अव्वल ठरल्या आहेत. यावर्षी खुद्द महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (Maharashtra HSC) अध्यक्ष शरद गोसावी यांच्या मुलीनेही बारावीची परीक्षा दिली होती. तिचा निकाल वडिलांनीच जाहीर केला आहे.

गोसावी यांची कन्या संस्कृती विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. तिने ७७.५० टक्के गुण मिळविले आहेत. बाणेर येथील आदित्य कनिष्ठ महाविद्यालयाची ती विद्यार्थीनी आहे. याबाबत गोसावी म्हणाले, "माझी मोठी मुलगी पुण्यातच एम.एस्सीचे शिक्षण घेत आहे. तर संस्कृतीला अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे. तिने 'जेईई मेन'ची परीक्षा दिलेली आहे. त्यात तिचे पर्सेंटाईल चांगले आलेले आहेत. तिला देशातील उत्तम राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) प्रवेश मिळू शकेल. त्याशिवाय तिने राज्यातील 'सीईटी' परीक्षा देखील दिली आहे."

राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT