पुणे

भीमा - पाटस कारखान्याला लागलेली आग संशयास्पद : रमेश थोरात

प्रफुल्ल भंडारी

दौंड ( पुणे) : पाटस (ता. दौंड ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे तारण असलेल्या ६९ हजार ३७६ क्विंटल साखर साठा असलेल्या गोदामातील साखर पोत्यांना मागील महिन्यात लागलेली आग संशयास्पद आहे. सदर आगीची कसून चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली आहे.

दौंड शहरात आज (ता. २०) पत्रकारांशी बोलताना रमेश थोरात यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार राहुल कुल गेल्या १९ वर्षांपासून सध्या बंद असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. कारखान्याने घेतलेल्या कर्जापोटी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे एकूण १ लाख १६ हजार ४९४ क्विंटल साखर तारण आहे. त्यापैकी सन २०१३ - २०१४ व सन २०१४ - २०१५ या दोन गळित हंगामातील दहा हजार पोत्यांचे लिलाव करण्याची जाहिरात २२ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झाली होती.  जाहिरात प्रकाशित झाल्याच्या तिसऱ्या दिवशी कारखान्याच्या गोदामाला मध्यरात्री आग लागली. सदर गोदामात ६९ हजार ३७६ क्विंटल साखरेचा साठा होता. आगीनंतर पंचनामा करण्यात आला परंतु पंचनाम्याचा अहवाल बॅंकेला आजअखेर प्राप्त झालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

रमेश थोरात म्हणाले, `` बॅंकेने वसुलीसाठी तारण साखरेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर तीन दिवसांत आग लागली.तारण साखर असलेल्या गोदामाला पाच वर्षात एकदाही आग लागली नाही परंतु लिलाव करण्याची वेळ आल्यानंतर आग  लागल्याने ती संशयास्पद आहे. गोदामात वीजजोड नाही त्यामुळे शॅार्टसर्किटचा प्रश्न नाही. आगीनंतर पाणी मारून आग विझवताना आग न लागलेला साखरेचा साठा सुध्दा पाण्याने खराब करण्यात आला असावा, अशी शंका आहे. सदर आगीची कसून चौकशी करण्याची मागणी पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केलेली आहे. ``

पुणे जिल्हा बॅंकेचे १३० कोटी एनपीए

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने भीमा सहकारी साखर कारखान्याला भांडवली कर्ज, मध्यम मुदत कर्ज व अन्य भांडवली कर्ज दिलेले आहे. परंतु परतफेड न झाल्याने एप्रिल २०१७ पासून कारखान्याचे संपूर्ण कर्ज अनुत्पादक कर्ज (नॅान परफॅार्मिंग अॅसेट) झाले असून बॅंकेला कारखान्याकडून १३० कोटी रूपये येणे आहे. 

याबाबत राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व चौकश्यांना तयार असल्याचे सांगत या आगीची पुणे पोलिसांमार्फत सर्व चौकशी सुरू असून त्यातून सर्व तथ्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT