Sadanand Mohol
Sadanand Mohol Sarkarnama
पुणे

माजी क्रिकेटपटू सदानंद मोहोळ यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माजी क्रिकेटपटू सदानंद नामदेवराव मोहोळ (वय ८४) (Sadanand Mohol) यांचे शनिवारी रात्री पुण्यात अल्प आजाराने झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. माजी खासदार अशोक मोहोळ (Ashok Mohol) यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

क्रिकेटपटू असलेल्या मोहोळ यांच्या घरात वडील नामदेवराव उर्फ मामासाहेब मोहोळ यांच्या रूपाने राजकारणाचा मोठा वारसा होता. मामासाहेब मोहोळ हे पन्नास-साठच्या दशकातील कॉंग्रसचे पुणे जिल्ह्यातील मोठे नेते होते. घरात राजकारणाचा वारसा असला तरी सदानंद मोहोळ क्रिकेटकडे वळाले. सदानंद मोहोळ यांची १९६७ साली इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली होती. ते उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज होते. १९५९-६० च्या मोसमांत त्यांनी गुजरातविरुद्धच्या सामन्यातून महाराष्ट्राच्या रणजी संघात पदार्पण केले. १९७१ पर्यंत त्यांनी रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले.

१९६४-६५ आणि १९६६-६७ या मोसमांत त्यांची पश्चिम विभागाच्या संघातही निवड झाली होती. ४५ प्रथम दर्जाचे सामने खेळताना त्यांनी १६५ बळी पटकावले होते. पुणे विद्यापीठाच्या संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. १९६२-६३ मध्ये त्यांच्या कर्णधारपदाखील पुणे विद्यापीठाच्या संघाने ‘रोहिंग्टन वारिया’ हा चषक प्रथमच जिंकला होता.महाराष्ट्र रणजी संघाच्या निवड समितीत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते.

मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. पूना एक्झिबिटर्स असोसिएशनचेही ते अध्यक्ष होते. आज दुपारी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत मोहोळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT