Atul Benke
Atul Benke Sarkarnama
पुणे

'शिवसेनेच्या माजी आमदाराने आदित्य ठाकरेंचा आदेश झुगारला'

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : जुन्नरच्या शिवसेनेच्या (shivsena) माजी आमदाराला सध्या काही काम नाही. त्यांचे उपोषणनाट्य म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी जनतेची दिशाभूल व बुद्धीभेद करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान आहे. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्रितपणे सर्व शक्तीनिशी लढविणार आहेत, असे जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी सांगितले. (Former Shiv Sena MLA disobeys Aditya Thackeray's order : Atul Benke)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार बेनके यांनी बिबट सफारीबाबत झालेले उपोषण नाट्य व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेली टीका या बाबत नाराजी व्यक्त केली. आमदार बेनके म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जुन्नर तालुक्यात बिबट सफारी करण्याचा निर्णय २१ मार्च २०२२ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. बिबट सफारीसाठी मी अधिवेशन काळात सहा वेळा पवार, ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली आहे. असे असताना सध्या शिवसेनेत असलेल्या व पक्षनिष्ठा नसलेल्या माजी आमदारांनी बिबट सफारीच्या मागणीसाठी २२ मार्चपासून उपोषण सुरू केले. पर्यटन मंत्री ठाकरे यांनी उपोषण न करण्याचे आदेश देऊनही स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी साडेतीन दिवसांचे उपोषण केले. बिबट सफारीचा प्राथमिक सर्व्हे झाला आहे. सर्व तांत्रीक बाबी पूर्ण करून बिबट सफारीचा प्रकल्प जुन्नरमध्येच करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

आमदार बेनके म्हणाले नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालुक्यातील दहा कामांना ४९ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या व्यतिरिक्त जुन्नर नगरपालिका हद्दीत विकास कामासाठी मागील तीन वर्षांत वीस कोटी रुपयांचा निधी, नारायणगाव येथील शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी पन्नास कोटी, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी एक कोटी, येडगाव येथील क्रीडा संकुलासाठी पाच कोटी, यशवंतराव चव्हाण पर्यटन विकासासाठी ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या वेळी राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस किशोर दांगट, जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे, गुलाबराव नेहरकर, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, देवराम लांडे, सभापती विशाल तांबे, विकास दरेकर, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, भाऊसाहेब देवाडे, सुरज वाजगे, अरुण पारखे, उज्ज्वला शेवाळे, सुरेखा वेठेकर, अक्षदा मांडे, जुन्नर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते फिरोजभाई पठाण, नगरसेवक भाऊ कुंभार, आरती ढोबळे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT