Fursungi Uruli Devachi News: फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्यासह तब्बल २८ नगरसेवकांनी निवडणूक लढविताना शपथपत्रासोबत बनावट कागदपत्रे जोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते नितीन उर्फ नीतेश गायकवाड यांनी ही तक्रार केली आहे. संबंधित नगरसेवकांनी निवडणूक लढविताना नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची आणि नगरपरिषदेवर नवीन प्रशासक नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीनुसार, काही नगरसेवकांकडे थकबाकी असतानाही त्यांनी थकबाकी नसल्याचे दाखले निवडणुकीच्या वेळी सादर केले. काही नगरसेवकांनी स्वतःचे घर असतानाही शपथपत्रात घर नसल्याचे नमूद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, काही नगरसेवकांच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांबाबतही तक्रारी करण्यात आल्या आहेत.
एका नगरसेवकाचे नाव दोन विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत असल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिगटे यांना पत्र पाठविले आहे. तक्रारीसोबत संबंधित कागदपत्रे जोडण्यात आली असून, तक्रारदाराने यापूर्वीही या प्रकरणी वारंवार अर्ज केल्याचा उल्लेख पत्रात आहे.
या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची चौकशी करून संबंधित नगरसेवकांकडून खुलासे घेण्याचे आणि चौकशीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुख्याधिकारी या प्रकरणात काय निष्कर्ष काढतात आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
या आरोपांवर नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राजकीय कुरघोडी करण्याच्या उद्देशाने काही जणांकडून अशा खोट्या तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. याबाबतचे आमचे खुलासे मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी प्रसाद शिगटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्राची दखल घेऊन संबंधित नगरसेवकांकडून खुलासे मागविण्यात आल्याचे स्पष्ट केले. सर्वांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
एकूणच, नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांविरोधातील या तक्रारीमुळे फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, आरोपांची सत्यता आणि संबंधित नगरसेवकांच्या सदस्यत्वाबाबत पुढील निर्णय काय होणार, हे चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.