पुणे मेट्रो

 

सरकारनामा

पुणे

पुण्यातील गणेश मंडळे म्हणतात...मेट्रोच्या पुलाला आमचा विरोध नव्हताच...!

मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभेत या विषयावरून वाद झाला होता.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : संभाजी पुलावरील (लकडी पूल) (Sambhaji Bridge) मेट्रोच्या मार्गिकेला शहरातील काही गणेश मंडळांनी विरोध केल्याने पुलाचे गर्डर टाकण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते.अधिक काळ काम बंद राहणे योग्य नव्हते. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलीस संरक्षणात काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. या पाश्‍र्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी प्रथमच भूमिका जाहीर करत मेट्रोच्या कामाला आमचा कधीच विरोध नव्हता, असे जाहीर केले आहे.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा गणपती श्री.तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, मानाचा पाचवा गणपती श्री केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदन आज प्रसिद्धीस दिले.

मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभेत या विषयावरून वाद झाला होता. या पाश्‍र्वभूमीवर उद्या (गुरुवारी) महापालिकेची होणाऱ्या मुख्यसभेआधी प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने यावादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.मंडळांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘ सध्या संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंची बाबत वाद,संभ्रम सुरु आहे. त्या अनुषंगाने पुण्यनगरीच्या अष्टविनायक मंडळांना खुलासा करणे आवश्‍यक वाटते. गेल्या चार वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे, मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे, पण मेट्रोची मार्गिका गणपती विसर्जन मार्गावरून जात असताना हे काम सुरु झाले त्यावेळी संभाजी पुलावरील उंचीचा मुद्दा कोणाच्याही लक्षात आला नाही किंवा कोणी निदर्शनास आणून दिला नाही.’’

काम अंतिम टप्प्यात आल्यावर मेट्रोच्या पुलाच्या उंचीमुळे गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूक रथास अडथळा निर्माण होईल म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांना काम बंद करण्याचे निवेदन गणेश मंडळांनी दिले होते. महापौरांनी मेट्रोचे अधिकारी व गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न जवळपास चार महिने केले. परंतु तज्ज्ञ समितीने सुचविलेले पर्याय अव्यवहार्य असल्याने महापौरांनी काम सुरु करण्यास सांगितले, असे या निवेदनात म्हटले आहे.

सर्वजण गणपती मंडळ कार्यकर्ते असलो तरी जबाबदार पुणेकर नागरिक आहोत. १२५ वर्षाहून अधिक पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असून, समाज प्रबोधन,समाजहिताला प्राधान्य दिले आहे. संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंची बाबत आमचा कधीही विरोध नव्हता. कोरोनाच्या काळात साधेपणाने उत्सव साजरा केला. प्रशासनाला सहकार्य केले. अशी परंपरा असलेल्या गणेशोत्सवामुळे यावेळी संभाजी पुलावरील कामास आम्ही विरोध करत नाही. गणेशोत्सव कार्यकर्त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT