Ganesh Visarjan News
Ganesh Visarjan News Sarkarnama
पुणे

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॅाल्बी वाजवताय मग ही बातमी वाचाच...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक वेळत संपविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न नक्की असेल. विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त वेळ खंड पडू नये किंवा रेंगाळू नये याकडे पोलिसांचे विशेष लक्ष असणार,असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitab Gupta) यांनी गुरुवारी (ता.८ ऑगस्ट) सांगितले. तसेच स्पीकर, डॅाल्बीबाबत, आवाजाच्या मर्यादेच्या उल्लंघनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्‍यक आहे, नागरीकांची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणुक सोहळ्यातील बंदोबस्ताची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर.राजा उपस्थित होते.

कोरोनामुळे विसर्जन मिरवणुक झाली नव्हती. दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला. अनंत चतुर्दशी दिवशी (ता.9) शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रथेप्रमाणे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. विसर्जन मिरवणुक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

गुप्ता म्हणाले, विसर्जन मिरवणूकीत रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन मंडळांनी करावे. उच्चक्षमतेचे स्पीकर किंवा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास आणि नागरीकांनी तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.

विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्वरीत कारवाई केली जाईल. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दागिने, मोबाइल हिसकावणे, छेड काढणे असे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार आहेत.

दरम्यान, खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलामुळे मिरवणुकीतील देखाव्यांची उंची फुटांपेक्षा कमी असावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून विसर्जन मिरवणूकीत मंडळाचे रथ विसर्जन मार्गावर दाखल होतात. देखाव्यांची उंची पोलिसांकडून मोजण्यात येणार आहे. त्यामुळे खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलाच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT