पुणे

राष्ट्रवादीच्या 'घोडगंगा'तील २१ पैकी पाहिला संचालक शिवसेनेत दाखल!

भरत पचंगे

शिक्रापूर : गेल्या सहा महिन्यांपासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कारभाराबद्दल जाहीर वाच्यता करून बंडाचे निशाण फडकावलेले राष्ट्रवादीचे संचालक सुधीर फराटे हे आज अखेर 'मातोश्री'वर शिवबंधनात अडकले. अर्थात पक्षप्रवेशावेळीही त्यांनी पुन्हा 'घोडगंगा' ची ५ एकर जमिन अध्यक्षांनी बळकावल्याची गरळ ओकली. पण या पक्षप्रवेशाने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अशोक पवार व खासदार शिवाजीराव आढळराव यांचा एकमेकांना राजकीय `सॉफ्टकॉर्नर' नसण्याला मात्र पुष्टी मिळाली.

अशोक पवार यांनी 21 पैकी 21 संचालक निवडून आणून घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर चार वर्षांपूर्वी एकहाती सत्ता आणली होती. तेथील एकही संचालक ब्र काढीत नाही ही शिरूरच्या राजकारणाची वस्तुस्थिती. मात्र अशातच सहा महिन्यांपूर्वी संचालक सुधीर फराटे यांनी कारखान्याच्या कारभारावर टीका केली. या स्थितीत फराटे भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही होत्या. आज मात्र ते मातोश्रीवर पोहचले व शिवबंधनात अडकले.

जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशावेळी हवेलीतील काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मांडवगण सोसायटीचे संचालक रावसाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य अशोक जगताप, मच्छिंद्र जाधव, आप्पासाहेब फराटे, कृष्णराव फराटे, सामिर फराटे, निलेश इथापे, कैलास फराटे, रत्नाकर फराटे आदींसह १३ जनांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आंबेगाव-शिरूरचे क्रॉस कनेक्शन उध्वस्थ !
पवार-आढळराव आणि वळसे-पाचर्णे असे 'राजकीय सॉफ्टकॉर्नर कनेक्शन ' आहे अशी अनेक उदाहरणे शिरूर व आंबेगावात वारंवार निदर्शनास येत. मात्र शिवसेनेने गमावलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघातील जागेने हे एकमेकांचे सॉफ्टकॉर्नर उध्वस्त झाले, असे म्हणण्यास वाव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT