बारामती : राज्यातलं सरकार (State Government) आता बदलंय. पण, अजूनही आमच्या पुणे (Pune) जिल्ह्यात सरकार बदललंय, असं वाटत नाही. हा विषय आपल्याला जरा गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. मागच्या अडीच वर्षांत एक जरी अर्ज आम्ही कार्यकर्त्यांनी दिला, तर तो फेकून दिला जायचा. त्यामुळे भाजपनेही (BJP) फाटी टू फाटी राजकारण करण्याची आवश्यकता आहे, अशी खदखद माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज (ता. ६ सप्टेंबर) प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली. (Government has changed in the state but Pune still doesn't feel same : Harshvardhan Patil)
बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २६ सप्टेंबरपासून तीन दिवस येणार आहेत. त्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामतीत आले होते. त्यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील खंत व्यक्त केली.
ते म्हणाले की, राज्यातलं सरकार आता बदलंय. पण अजूनही आमच्या पुणे जिल्ह्यात सरकार बदललंय असं वाटत नाही. हा विषय आपल्याला जरा गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. मग ते कसं गांभीर्यानं घ्यायचं, हे एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची आवश्यकता आहे, अशातला काही भाग नाही. मागच्या अडीच वर्षांत एक जरी अर्ज आम्ही कार्यकर्त्यांनी दिला, तर तो फेकून दिला जायचा.
आज विरोधी पक्षातील काही लोकं रात्री-अपरात्री आपल्या नेत्यांना भेटतात. मी तुमचाच आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. कोण सत्कार करतं, तर कोण हार घालतं, आमची काम करा, अशी विनंती केली जाते. विरोधी पक्षाच्या लोकांनी आमच्या नेत्यांना भेटायला हरकत नाही. पण आमची भूमिका अशी आहे, भारतीय जनता पक्षानेसुद्धा यापुढील राजकारण, समाजकारण करताना फाटी बाय फाटी असंच राजकारण आपल्याला करावं लागणार आहे. तर या भागातील आपला कार्यकर्ता टिकू शकणार आहे. मला विश्वास आहे की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे आपल्याला न्याय देतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करु नये, जी काही कामे असतील, ती कामं करू देण्यात आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी ठाम उभा राहू, असा विश्वासही पाटील यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्रातील १६ आणि देशातील १४४ मतदारसंघात आपल्या भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल, यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. त्यामध्येच बारामती लोकसभा मतदासंघाचा समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला विजय मिळवायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला आतापासूनच कराव्या लागतील. बूथपातळीपर्यंत आपल्याला काम करावे लागणार आहे. बऱ्याच तालुक्यात मतदानादिवशी आपली यंत्रणा सक्षम नसते. बऱ्याच गावांत आपला कार्यकर्ते शेवटच्या दाेन दिवसांत कमी पडतो आणि मग काय घडतं, हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. बूथनिहाय पक्ष संघटन आपल्याला मजबूत करायचं आहे. काटेवाडीत आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढारी यायला घाबरतात; पण कार्यकर्ते आले हेाते, असेही पाटील यांनी नमूद केले.
माजी मंत्री पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे आपण निवडणुका लढवलेली आणि निवडणुकीत प्रत्यक्ष भाग घेतलेली माणसं आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब यांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यातून बारामतीत परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.