Maharashtra Gram Panchayat Election Result 2023 : राज्यातील दोन हजार 353 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता.५ ) मतदान प्रक्रिया पार पडली. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी थेट निवडणुका झाल्या. राज्यभरात अंदाजे ७४ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोकणातील सावंतवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. दोडामार्गमध्ये तीन ग्रामपंचायती आणि वेंगुर्लेमध्ये चार ग्रामपंचायतींंवर भाजप आणि ठाकरे गटाच्या सेनेने सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने दीपक केसरकरांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आमदार नितेश राणे यांना आपली सत्ता कायम ठेवण्यात यश आले आहे. कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघातील देवगड आणि कणकवलीतील ११ पैकी८ ग्रामपंचायती भाजपने, तर दोन ग्रामपंचायतीत ठाकरेंच्या शिवसेनेने, तर एक ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने मिळवली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सर्व १७ ग्रामपंचायतीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. एकुलती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाचे युवराज पाटील विजयी झाले. त्यांनी गिरीश महाजन यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत भाजपला पाठिंबा दिला.
बारामतीच्या काटेवाडीतील १६ पैकी १४ जागा अजित पवार यांच्या गटाने जिंकल्या आहेत. मात्र दोन जागांवर सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले आहे. काल मतदानावेळी काटेवाडीत भाजपने पैसे दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे काटेवाडीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या मुद्द्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीतील राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे.
नागपूरच्या काटोल तालुक्यात भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. काटोल तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. या ३६ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांच्या गटाने एक हाती सत्ता काबीज केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या गटास कर्जत जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवास सामाेरे जावे लागले आहे. कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सहाही ठिकाणी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला, तर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींंपैकी दोन ग्रामपंचायती या आमदार रोहित पवार यांच्या गटाला मिळाल्या आहेत.
राज्यभरात ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होत असताना सांगलीत मात्र ग्रामपंचायतींच्या निकालानंतर दोन गटांत जोरदार बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. मिरज तालुक्यातील खोतवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निकालावरून प्रकार घडला. जुना राजवाडा येथील मतमोजणी केंद्राबाहेर दोन गटांत प्रचंड शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. पण या ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या पॅनेलने सत्ता काबीज केली आहे.
माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे गटाचा दारुण पराभव झाला असून, शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा विलास देशमुख यांचा पराभव झाला आहे. येथे भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या पत्नी सुरजा बोबडे सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे भाजपच्या कर्डिले गटाचे विजय शेवाळे सरपंचपदी विजयी झाले आहेत, तर अपक्ष उमेदवार दिलीप गव्हाणे हेदेखील निवडून आले आहेत. सदस्यांच्या 15 जागांपैकी एक अपक्ष निवडून आला आहे. मात्र, मतमोजणी सुरू असताना दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकारही घडला. त्यामुळे मतमोजणीत थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता.
रांजणगाव महागणपती ग्रामपंचायतीवर 13 जागांसह सरपंचपदावर अजित पवारांच्या गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, शरद पवार यांच्या गटाला हा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांच्या गटाला केवळ तीनच जागा मिळाल्या आहेत.
आमदार लंके गटाकडून महायुतीचा अरणगावमध्ये धुव्वा उडवला आहे. नगर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अरणगाव ग्रामपंचायतीत आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल विजयी झाला आहे. सरपंचपदी पोपट पुंड विजयी झाले आहेत.
Gram Panchayat Election Results LIVE : इंदापूरच्या शिंदेवाडी आणि वकीलवस्ती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना हा धक्का मानला जात आहे. शिंदेवाडी ग्रामपंचायतीवर पल्लवी सौरभ झगडे या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. सरपंचपदासह सदस्यांच्या ९ जागा राष्ट्रवादीने मिळवल्या आहेत. त्याचबरोबर, वकीलवस्ती ग्रामपंचायतीत वनिता बाळू भोसले सरपंचपदी विजयी झाल्या आहेत.
बारामतीतील आठ ग्रामपंचायतींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सत्ता काबीज केली आहे. काल मतदानावेळी काटेवाडीत भाजपने पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती, पण आज निकालात बारामतीत अजित पवार यांच्या गटाने आठही ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे.
जुन्नर तालुक्यातील पारुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड करून गावच्या ज्येष्ठ व अनुभवी मंडळींनी गावाचा एकोपा जपला आहे. जयेश पिलाजी पुंडे यांची थेट सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तर मयूर दशरथ पवार, हौशीराम जनार्धन केदार, रोहिणी आकाश मोदे, शीतल जालिंदर आदींची सदस्यपदी निवड करण्यात आली.
Gram Panchayat Election 2023 Result Live : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली 3 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे.
तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तीन ग्रामपंचायतींवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले आहे.
Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने खाते उघडले. अजित लकडे बहुमताने विजयी झाले. नगर तालुक्यात उद्धव ठाकरेंच्या गटाने मैदान मारले आहे. हिवरे झरे ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब काळे सरपंचपदी विजयी झाले आहेत.
Gram Panchayat Election 2023 Result Live : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाने सत्ता काबीज केली आहे. नरेंद्र ऊर्फ अमोल गुंजाळ हे सरपंचपदी विजयी झाले आहेत, तर विखे पाटील गटाचा पराभव झाला आहे.
जळगावातील लोनवाडी ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची सत्ता आली आहे.
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील आठही ग्रामपंचायतींवर अजित पवार यांच्या गटाची सत्ता स्थापन केली आहे, तर बारामतीतील पाच ग्रामपंचायतींवरही अजितदादांच्या गटाने सत्ता मिळवली आहे.
- सोलापूर जिल्ह्यातील अंबाबाईची वाडी ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला.
- पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. अभिजित पाटील गटाचे दीपक शिंदे सरपंचपदी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या मोहन कोळेकर गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाने आपले वर्चस्व स्थापन केले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचा पॅनेल विजयी झाला असून, त्यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या पॅनेलचा उडवला धुव्वा उडवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.