Hadapsar Assembly Constituency 2024 Sarkarnama
पुणे

Hadapsar Assembly Election: प्रशांत जगताप जुळवताहेत हडपसर विधानसभा निवडणुकीचे गणित; चेतन तुपेंना आव्हान...

Sudesh Mitkar

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांसाठी बारामती आणि शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने हे मतदारसंघ काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. अजित पवार गटाबरोबर आता शरद पवार गटही शिरूर मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह मोडमध्ये आला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि दिलीप वळसेंच्या विधान सभा मतदारसंघात मंचरला शरद पवार जाहीर सभा 21 फेब्रुवारीला घेणार आहेत. मंचर एसटी स्टॅंडसमोरील चार एकराच्या मोकळ्या मैदानात दुपारी तीन वाजता सभा होणार आहे. 30-35 हजाराची गर्दी या सभेला होईल,असा दावा केला जात असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे हे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी आज शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विजय निश्चिती मेळावा घेणार आहेत. या माध्यमातून अजित पवार यांच्यासोबत असलेले हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांना आव्हान देण्यात येणार आहे.

चेतन तुपे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काही काळ संभ्रम अवस्थेमध्ये होते. मात्र, नंतरच्या काळामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचे पसंत केलं. त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवारांनी दौरा केला. आणि विकासकामांना चालना दिली.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या दौऱ्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार हेदेखील हडपसरच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्याने या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विरोधात मोर्चे मागणी सुरू करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षदेखील या मतदारसंघामध्ये पूर्णपणे ॲक्टिव्ह झाला असून, आज मेळावा घेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तयारीला लागला असला तरी या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका देखील काही महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष इच्छुक असून त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार देखील आहे.

मात्र, महाविकास आघाडीचा विचार केला तर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला असल्याने त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार मैदानात असेल, असे बोलले जात आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आगामी हडपसर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीवेळीदेखील ते इच्छुक होते. मात्र, ही संधी चेतन तुपे यांना मिळाली यंदा मात्र चेतन तुपे हे अजित पवार गटात गेल्यामुळे प्रशांत जगताप यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी बरोबर प्रशांत जगताप हे आपल्या विधानसभा निवडणुकीचीदेखील तयारी करत असल्याच्या चर्चा हडपसरमधील राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. त्यामुळे या मेळाव्यातून प्रशांत जगताप आणि जयंत पाटील कोणती भूमिका मांडणार हे पाहणं औचित्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT