पुणे

राष्ट्रवादीच्या `होम पीच`वर हल्लाबोलचा आवाज मंगळवारपासून घुमणार!

सरकारनामा ब्यूरो

शिरूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची पुणे जिल्ह्यातील पहिली सभा उद्या (ता. 10) शिरूरमध्ये होत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ न्हावरे फाटा येथून सुमारे पाच हजार युवकांची मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. 

हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून होणाऱ्या सभेसाठी पाबळ फाटा परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला असून, सकाळी साडेदहा वाजता जाहीर सभा होईल, अशी माहिती माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी दिली. अजितदादा व तटकरे यांच्याबरोबरच; विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, युवा नेते संग्रामसिंह कोते आदी या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी दहा वाजता या नेत्यांचे न्हावरे फाटा येथे आगमण होईल. तेथून भव्य रॅलीने त्यांना सभास्थानी आणले जाईल. या मोटारसायकल रॅलीत सुमारे पाच हजार युवक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 


 अॅड. पवार म्हणाले, "सन 2014 ला देश व राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा "अच्छे दिन' येतील, अशी सामान्य जनतेला अपेक्षा होती. परंतु उलटे झाले असून, शेतकरी, कामगार, व्यापारी व सर्वच घटकांवर वाईट दिवस आले आहेत. कुठलाही वर्ग शासनाच्या कामगिरीवर समाधानी नाही. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुंडगिरीने थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाला कुठल्याच गोष्टीचे गांभीर्य राहिलेले नसून, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. याविरोधात सामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोचविण्यासाठी हे आंदोलन होत असून, सामान्य जनता व शेतकरी वर्गाने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली संघटित ताकद दाखवावी.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT