Harshada Jadhav Election Result Sarkarnama
पुणे

Harshada Jadhav: भाजपला मोठा धक्का! पुणे पदवीधर मतदारसंघात 9,700 हून अधिक मतांनी हर्षदा देशमुख-जाधव विजयी

Harshada Deshmukh Jadhav wins MLC Election : यामुळं पुण्यात शिक्षक मतदारसंघ हा भाजपला तर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाला आहे.

Amit Ujagare

Harshada Deshmukh Jadhav wins MLC Election : पुणे पदवीधर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय झाला आहे. त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा राखली आहे. तब्बल दोन दिवस सुरु असलेल्या विधान परिषदेच्या मतमोजणीनंतर अखेर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा निकाल जाहीर झाला. यामुळं पुण्यात शिक्षक मतदारसंघ हा भाजपला तर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाला आहे.

भाजपला मोठा धक्का!

हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयामुळं भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. कारण सत्ता, प्रचंड आर्थिक ताकद आणि संघटनात्मक रसद केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही पुणे विभागासारख्या मतदारसंघात झालेला पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. पण सर्वात विशेष म्हणजे पदवीधरांनी सगळीकडचं नाकारल्यानं भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं हा निकाल केवळ एका मतदारसंघाचा निकाल नसून, पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय वाऱ्याची आणि युवा वर्गाच्या असंतोषाची पावती असल्याची चर्चा आहे.

सुरुवातीलाच विजयाची हुलकावणी

पुणे पदवीधरमध्ये विजयासाठी 1 लाख 13 हजार 113 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. तर, 17 हजार 299 मतं बाद करण्यात आली होती. आज पहाटे साडेतीन वाजताच्या मतमोजणी नंतर हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 385 मते मिळाली होती. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 725 मतांची आवश्यकता होती. भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्यापासून त्या 11 हजार मताधिक्याने पुढे होत्या. पण कोटा पूर्ण न झाल्यामुळं दुसऱ्या पसंतीची मतं मोजणीला सुरुवात झाली. यानंतर या मतमोजणीनं संपूर्ण दिवस घेतला आणि शेवटी अत्यंत चुरशीनं झालेल्या या निवडणुकीत हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयी घोषित करण्यात आलं.

सोलापूरमधून सर्वाधिक मतदान

पुणे पदवीधरसाठी सर्वाधिक मतदान सोलापूर जिल्ह्यातून झालं आहे. तब्बल 71.43 टक्के मतदान एकट्या सोलापूरमध्ये नोंदवले गेलं. तर, सातारा जिल्ह्यातून 66.94 टक्के मतदान झालं. पुणे जिल्ह्यातून 61.47 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी मतदान 55.51 टक्के हे सांगली जिल्ह्यातून झालं. पुणे पदवीधरसाठी एकूण 2 लाख 43 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला होता.

SCROLL FOR NEXT