sharad pawar harshvardhan patil sarkarnama
पुणे

VIDEO : शरद पवारांशी चर्चा, तुतारी हाती घेणार? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं

Akshay Sabale

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना तिकीट देण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोणता निर्णय घेणार? अशी चर्चा रंगली आहे.

हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) संपर्क साधण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यातच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारसाहेब यांच्याशी अडीच तास चर्चा केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी वसंतदादा शुगर गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी येथे बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( harshvardhan patil ) उपस्थित होते. यावेळी शरद पवारसाहेबांशी भेट झाल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच, निवडणुकीला उभे राहावे, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. ते बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "माझी शरद पवारसाहेबांसोबत ( sharad pawar ) भेट झाली. आमच्यात अडीच तास चर्चा झाली. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटबाबत चर्चा झाली. यात कुठेही राजकीय चर्चा झाली नाही."

पक्ष सोडायचाच विचार केला, तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, असं विधान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना उद्देशून केलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं, "बावनकुळे कुठल्या संदर्भानं बोलले, हे मला माहिती नाही. माझ्याकडून कुठलीही भूमिका झाली नाही. मी कुणालाही भेटलो नाही. माझ्याशीही कुणी संपर्क साधला नाही."

"अजितदादांचे इंदापूर येथे दौरे सुरू झाले आहेत. तालुक्यातील विद्यमान आमदाराला तिकीट मिळेल, असं सूत्र आहे. मी निवडणूक लढवावी, असा आमच्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे. इंदापूर तालुक्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. तीन आठवड्यापूर्वी माझी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. तेव्हा, फडणवीसांनी निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं," अशी माहिती पाटील यांनी दिली.

"विधानसभेच्या तयारीबद्दल चर्चा करण्याचा विषय नाही. आम्ही कायम लोकांमध्ये असतो. देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पातळीवर विधानसभेबद्दल काय निर्णय होतो, ते पाहू," असं पाटील यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT