कळस (जि. पुणे) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूर (Indapur) तालुक्यातील नेत्यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. विळ्या-भोपळ्याचे वैर असलेले आणि एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे माजी मंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) व भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल भिसे यांनी भरवलेल्या गजीढोल स्पर्धेस उपस्थिती लावत ढोल वाजविण्याचा आनंद लुटला. (Harshvardhan Patil's attendance at function of NCP office-bearers; Dattatrey Bharne, Praveen Mane also present)
दरम्यान, आमदारकीचे स्वप्न पाहणारे प्रवीण माने (Pravin Mane) यांनीही येथे उपस्थिती लावत ढोल वाजवून उपस्थित स्पर्धकांना प्रोत्साहीत केले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत नेमका कोणाच्या विजयाचा ढोल वाजणार, अशी चर्चा यात्रेदरम्यान रंगली होती. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अमोल भिसे यांच्या व्यासपीठावर लावलेल्या हजेरीमुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या आहेत.
अमोल भिसे मित्र मंडळाकडून दरवर्षी बाबीर यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी गजीढोल स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या २३ वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जपली आहे. यामुळे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांचे संघ यामध्ये सहभागी होत असतात. यंदाही त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेस तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली.
आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दशरथ माने, प्रवीण माने, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही स्पर्धेला हजेरी लावली. या नेत्यांनी स्पर्धेस उपस्थिती लावत डोक्यावर फेटा बांधून, कपाळी गुलाल माखून आणि गळ्यात ढोल अडकवून तो वाजविण्याचा आनंद लुटला. ज्याप्रमाणे बाबीर देवाचा ढोल वाजविला, त्या प्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्याच विजयाचा ढोल वाजवा, यासाठी बाबीर देव पावावा अशी मनोकामना या नेत्यांनी कशावरुन केली नसावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली होती.
दरम्यान, लोप पावत चाललेल्या गजी ढोल स्पर्धेचे आयोजन करुन परंपरा जपण्याचे काम सुरू केल्याने माजी मंत्री पाटील यांनी अमोल भिसे मित्र मंडळाचे कौतुक केले. यामुळे पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थिती व त्यांच्याकडून भिसे यांचे झालेले कौतुक यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या वेळी या नेत्यांनी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान अमोल भिसे म्हणाले, आमच्या स्पर्धेचा कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपाचा असल्याने, कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना आग्रहाने कार्यक्रमास आणल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.