पुणे

पुनर्वसनाचे शेरे उठविण्यासाठी प्रयत्न करू : हर्षवर्धन पाटील

डाॅ. संदेश शहा

इंदापूर :धरणग्रस्तांसाठी राखीव 35 गावांतील पुनर्वसन जमिनीबाबत इतर हक्क उताऱ्यावरील हस्तांतर, गट विभाजन व वाटप इत्यादीसाठी बंदी असलेला शेरा उठवला जाईल. तसेच, खडकवासला कालव्याचे आवर्तन तालुक्‍याला नियमितपणे दिले जाईल,'' अशी ग्वाही माजी सहकारमंत्री तथा महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

पाटील यांनी तालुक्‍यातील लोणी देवकर परिसरातील थोरात वस्ती, देवकर वस्ती, राखुंडे, जगताप व घाडगे वस्ती येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी बाळासाहेब राखुंडे, दत्तात्रेय थोरात, शिवाजी थोरात यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या परिसरातील जमिनी संपादन करण्याविषयी 1979 मध्ये अध्यादेश काढण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी 1990 पासून सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवरील सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात शेरा पडला. त्यामुळे जमीनवाटप, विक्री थांबली. शेतकऱ्यांना कर्ज मिळेनासे झाले. त्यातच पाच वर्ष खडकवासलाचे पाणी न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशी व्यथा दत्तू थोरात, दादा तोरवे, अविनाश देवकर, राम देवकर, विठ्ठल राखुंडे, संग्रामसिंह देशमुख यांनी मांडली.कर्मयोगी कारखान्याने उसाला जादा भाव द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

पाटील म्हणाले, "सातबारा'वरील शेरा हटविण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले. खडकवासलाचे पाणी तालुक्‍यास पूर्वीप्रमाणे मिळावे, या कालव्यावरील सर्व पाझर तलाव भरून घ्यावेत, उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच शेतीमाल प्रकिया उद्योग उभारावेत, लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणून बेरोजगारीचा प्रश्न मिटावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करू. मात्र, त्यासाठी महायुतीच्या उमेदवारास विजयी करा.''

कर्मयोगी कारखान्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना "एफआरपी'पेक्षा जादा भाव दिला आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी ऍड. विकास देवकर, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, सुभाष भोसले, सचिन डोंगरे, रमेश डोंगरे, रामस्वरूप तोंडे, श्रीकांत देवकर, रमेश देवकर उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT