Dattatray Bharane Sarkarnama
पुणे

भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांना धक्क्यावर धक्के : आक्रमक युवा नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

पळसदेव-बिजवडी गटातून सोनाई परीवाराचे संचालक प्रवीण माने यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा अवघ्या काही मताधिक्याने पराभव झाला होता.

डॉ. संदेश शहा

इंदापूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) हे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना एकामागून एक धक्के देत आहेत. पाटील यांचे ‘होम पीच’ असलेल्या बावडा-लाखेवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, माजी सभापती स्वाती शेंडे व बापूराव शेंडे यांनी आणि आज (ता. ३१ मार्च) भाजपची आक्रमक तोफ दीपक जाधव यांनीही राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी माजी मंत्री पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांनाही राष्ट्रवादीने गळाला लावले होते, त्यामुळे वातावरणाबररोबरच इंदापूरचे राजकारणही चांगलेच तापू लागले आहे. (Harshwardhan Patil's staunch supporter, BJP youth leader Deepak Jadhav joins NCP)

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपचे युवा आक्रमक नेते दीपक जाधव यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी जाधव यांनी मंत्री भरणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या समवेत एकत्र गाडीतून प्रवास करत नगरपरिषद कार्यक्रमात उपस्थिती लावली. हा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना चौथा धक्का आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या तीन एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, पंचायत समितीच्या माजी सभापती स्वाती शेंडे, बापूराव शेंडे यांच्या बरोबरच दीपक जाधव यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. ‘ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अब बाकी है’ अशी राज्य मंत्री भरणे यांची भूमिका आहे.

दीपक जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार, अशी चर्चा गेले अनेक दिवसांपासून होती. त्यांच्या प्रवेशामुळे त्याला आज पूर्णविराम मिळाला. जाधव यांनी २००६-०७ मध्ये इंदापूरच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करत दोन वर्षे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत पक्ष संघटन वाढविले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते २०१० मध्ये तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. काँग्रेसमध्ये ते हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक बनले होते.

गलांडवाडी नं.१ ग्रामपंचायतीवर त्यांची २००९ पासून एकहाती सत्ता आहे. पळसदेव-बिजवडी गटातून सोनाई परीवाराचे संचालक प्रवीण माने यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा अवघ्या काही मताधिक्याने पराभव झाला होता. त्यामुळे स्वगृही परतल्यानंतर त्यांच्यावर काय जबाबदारी येणार, हे ३ एप्रिलनंतर समजणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT