वालचंदनगर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी आपले राजकीय विरोधक माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच जोरदार धक्का दिला आहे. पाटील यांचे होम ग्राउंड असलेल्या लाखेवाडी-बावडा (ता. इंदापूर) जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य श्रीमंत ढोले हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. (Harshwardhan Patil's supporter Shrimant Dhole will join NCP)
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे ता. ३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. या मेळाव्यात ढोले यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती खुद्द राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. भरणे यांनी यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांना राष्ट्रवादीत आणून धक्का दिला होता. त्यानंतर पाटील यांना बालेकिल्ल्यात बसणारा हा दुसरा मोठा धक्का आहे.
राज्यमंत्री भरणे यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१२ मध्ये भरणे यांना थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करून त्यांच्या विधानसभेची वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. भरणे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला. त्याचा फायदा त्यांना २०१४ च्या निवडणुकीत झाला. भरणे हे राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्यातील पहिले आमदार झाले. या काळामध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतानाही भरणे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे १३५० कोटींचा निधी आणला.
विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील काही प्रमुख नेत्यांनी भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र पक्षाने भरणे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. या निवडणुकीत भरणे यांचा निसटता विजय झाला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची इंदापूर शहरात झालेली शेवटची सांगता सभा भरणेंच्या विजयासाठी निर्णायक ठरली होती. या सभेत पवार यांनी निवडणुकीच्या काळात दादागिरी करणाऱ्यांना जाहीर इशारा दिला हेाता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पक्षाने भरणे यांच्याकडे सहा खात्यांची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली. मंत्री झाल्यानंतर भरणे यांनी अनेक विषय मार्गी लावले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गतवर्षी इंदापूरमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भरणे यांचा ३ हजाराने नव्हे तर ३० हजारांनी विजय झाला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. याची जय्यत तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी सहकारमंत्री पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर लाखेवाडी-बावडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या प्रवेशाची जोरदार तयारी सुरु केली आहे. शेतकरी मेळाव्यात ढोले यांच्या अनेकांचे प्रवेश राष्ट्रवादीत होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.