Pandharpur Wari latest news
Pandharpur Wari latest news  
पुणे

महिला वारकऱ्यांसाठी यंदाची वारी ठरणार आरोग्यवारी

सरकारनामा ब्युरो

पुणे : कोरोना महामारीमुळे (Covid 19) गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आवाक्यात आल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. या दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी येत्या २१ जून रोजी पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यासाठी वारकऱ्यांनीही जय्यत तयारी सुरु केली आहे. पण यंदाची पालखी ही महिला वारकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. याचे कारणही तसेच आहे. (Pandharpur Wari latest news)

वारी सोहळ्यात सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. तरीही पालखी सोहळ्यादरम्यान महिलांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे वारीनंतर अनेक महिला आजारी पडतात. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या वतीने वारकरी महिलांसाी आरोग्यवारी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या आरोग्यवारी उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे रविवारी (१९ जून) दुपारी १२.२०वा. होणार आहे. राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण यावेळी उपस्थित राहणार आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाची वारी ऐतिहासिक ठरणार आहे. यंदा प्रथमच वारकरी महिलांना वारीदरम्यान आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. यात महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष , स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांची सुविधा पुरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोग्यवारी संकल्पना मांडली. या 'आरोग्यवारी' या उपक्रमाच्या माध्यमातून वारकरी महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

- वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.

- सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.

- स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

- महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.

अशा सुविधा पुरविण्याबाबत पुणे , सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनास निर्देश देण्यात आलेले होते. त्यानंतर तिन्ही जिल्ह्याच्या प्रशासनाने आरोग्यवारी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे असं म्हणता येईल,अशी भावना चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT