black-magic sarkarnama
पुणे

धक्कादायक: मूल होण्यासाठी अघोरी जादूटोणा; विवाहितेला पाजले कोंबडीचे रक्त

Amol Jaybhaye

पिंपरी : लैंगिकदृष्ट्या सक्षम नसूनही एका तथाकथित अभियंत्याने (इंजिनिअर) लग्न करून एका तरुणीचे आयुष्य उध्वस्त केल्याची संतापजनक घटना नुकतीच पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) भोसरीत (Bhosari) उघडकीस आली आहे. चोर तो चोर, वर शिरजोर या न्यायाने उलट या `इंजिनिअर` सह त्याच्या आईवडिलांनी मूल होत नाही, म्हणून या नवविवाहित तरुणीवर जादूटोणा सुरु करून तिचा छळ सुरु केला होता. त्यासाठी तिला कोंबडीचे रक्तही प्यायला लावले होते. दरम्यान, सहसा ग्रामीण भागात अधिक चालणारा हा अंधश्रद्धेचा प्रकार उद्योगनगरी व आयटीनगरीत घडल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. (husband-tortures-wife-black-magic-conceiving-son)

गेली तीन वर्षे ही फिर्यादी तरुणी मूकाटपणे हा सासूरवास सहन करीत होती. मात्र, सहनशीलतेची मर्यादा संपल्याने रविवारी (ता.१९) रात्री तिने आपला नवरा अमित सुदाम वाघूले (वय ३३), सासरा सुदाम श्रीपती वाघूले (वय६३) आणि सासू संध्या (वय ५३, रा. सर्व ओंकार निवास, संभाजीनगर, कॉलनी क्र. ६,आळंदी रोड, भोसरी) यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी या त्रिकूटाविरुद्ध हुंड्यासाठी छळ, त्यासाठी मारहाण, जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग यासह अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपींना अटक झाली नसल्याचे तपासाधिकारी जितेंद्र कदम यांनी सरकारनामाला सांगितले. चौकशीत जादूटोणा करणारा कनेरसर (ता. खेड, जि. पुणे) येथील बुवाचा हात या घटनेत आढळल्यानंतर त्यालाही आरोपी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदर तरुणीची फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर २०१८ ते यावर्षी आतापर्यंत ही घटना घडली आहे. त्यातील आरोपी वाघूले हे मूळचे पिंपरी पेंढारचे (ता. जुन्नर, जि. पुणे) राहणारे आहेत. अमितने आपण इंजिनिअर असल्याचे सांगून सदर तरुणीशी लग्न केले. तो इंजिनिअर नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिला लग्नानंतर समजले. एवढेच नाही, तर लैंगिकदृष्ट्याही तो सक्षम नव्हता व नाही. ही बाबही त्याने व त्याच्या आईवडिलांनीही लग्न होण्यापूर्वी दडवून ठेवली होती. मात्र, लग्न झाल्यावर मूल होत नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी या तरुणीचाच छळ सुरु केला.

रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी तसेच घरखर्चाकरिता माहेराहून पैसे आण, म्हणून तिच्यामागे तगादा सुरु झाला. तिच्या सासऱ्यानेच तिला जवळ ओढून तिचा विनयभंग केला. नवऱ्याच्या औषधौपचारावर पैसे वाया घालवण्यापेक्षा मी तुला मूल देतो, असे म्हणत त्याने शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आपला नवरा इंजिनिअर नसून तो लैंगिकदृष्ट्याही सक्षम नसल्याची बाब या नवविवाहितेने आपल्या आईवडिलांच्या कानावर घातली. त्यानंतर, तर तिचा आणखी मानसिक व शारिरीक छळ सुरु झाला. तो असह्य झाल्याने काल रात्री या तरुणीने थेट भोसरी पोलिस ठाणे गाठले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT