पुणे

खासदार आढळरावांना मी चितपट करेन : देवदत्त निकम 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवेसनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कोण लढणार, याचा शोध सुरू असतानाच राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकीतील उमेदवार देवदत्त निकम यांनी आपण आढळरावांना चितपट करू शकतो, असा दावा केला आहे. आढळरावांच्या फसव्या घोषणांना मतदारसंघातील जनता वैतागली असून, त्याचा परिणाम निवडणुकीत दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या संभाव्य उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादीची नेतेमंडळी आढळराव यांच्यावर टीका करतात. पण त्यांना पर्याय कोण देणार, यावर काही बोलत नाही. त्यामुळेच आढळराव हे आपल्या विरोधात लढण्यासाठी समोर उमेदवारच नाही, हे जोराने सांगतात. निकम यांनी स्वतःहून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने पक्ष त्याकडे किती गांभीर्याने पाहणार, हे येत्या काही दिवसांत कळेल. 

"सरकानामा'शी बोलताना निकम यांनी सांगितले की आढळराव हे गेल्या निवडणुकीत निव्वळ मोदी लाटेवर निवडून आले. आपण केंद्रात मंत्री होणार, अशी आवई त्यांनी प्रचारात उठवली होती. बैलगाडा प्रश्‍न सोडविणार, पुणे-नाशिक रेल्वे आणणार, गावांचा विकास आराखडा राबविणार, स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देणार, अशा अनेक फसव्या घोषणा त्यांनी केल्या. प्रत्यक्षात यातील काहीच घडलेले नाही. त्यामुळे आढळराव हे केवळ बोलबच्चन खासदार आहे. हे आता जनतेला कळून चुकले आहे. गेल्या निवडणुकीत मला तयारीला वेळ कमी मिळाला होता. आता सरकारच्या आणि खासदारांच्या अकार्यक्षमतेला जनता वैतागली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये निश्‍चित परिवर्तन होईल. 

असे असेल तर राष्ट्रवादीतील नेते त्यांच्याविरोधात का लढत नाहीत, या प्रश्नावर आमच्या पक्षात अनेक नेते शिरूरमधून लढण्यास इच्छुक आहेत, असे निकम यांनी सांगितले. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे का त्यांच्याविरोधात उभे राहत नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर वळसे पाटलांकडे राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत पाठविणे पक्षाला योग्य वाटत नसावे, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात इतरही अनेक नेते आढळरावांना मात देण्यासाठी सक्षम आहेत. पक्ष त्यापैकी कोणाचाही विचार करू शकतो. मला उमेदवारी मिळाली नाही तर मी पक्षाशी एकनिष्ठच राहणार असल्याचेही स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT