पुणे

Shyam Manav threat : "कल दो बजे तुझे गोली मारूंगा'; 'अंनिस'चे श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी

सरकारनामा ब्यूरो

Shyam Manav threat : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक अध्यक्ष आणि जादूटोणााविरोधी कायदा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव (Shyam Manav) यांना "तुमचा नरेंद्र दाभोळकर करू", अशी धमकी शनिवारी (ता. २१) आली होती. त्याबद्दल हिंजवडी पोलीस (Hinjavadi Police) ठाण्यात मंगळवारी (ता. २४) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्याम मानव यांचा मुलगा क्षितिज यामिनी श्याम (Kshitij Yamini Shyam) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच या धमकीच्या चार व्हॉटसअप मेसेज आल्यानंतर मानव यांच्या सुरक्षेचा पोलिसांनी आढवा घेतला. त्यांची मंत्र्याएवढी म्हणजे वायप्लस सुरक्षा व्यवस्था आहे. आता त्यात वाढही करण्यात आली आहे.

श्याम मानव हे मुंबईत राहतात. तर, त्यांचा मुलगा क्षितीज (वय ४३) हे बावधन, पुणे (Bavdhan, Pune) येथे राहतात. क्षितीज यांच्या मोबाईलवर हे धमकीचे मेसेज ९६३४६१९२६८ या मोबाईल नंबरवरून आले. तर ज्या नंबरवर हा मसेज आला तो नंबर श्याम मानव यांच्या यू् ट्यूब चॅनेलचा आहे. त्यामुळे ही धमकी वडिलांना आल्याची क्षितीज यांनी सांगितले.

अज्ञात आरोपीने अतिशय शिवराळ हिंदी भाषेत शिव्या देत ही धमकी मेसेज करून दिली आहे. "तू कहीपर भी छुपा हो, कल दो बजे तुझे गोली मार दूंगा", आणि "बिल्कूल नरेंद्र दाभोलकर जैसा तेरा नतीजा होगा", अशी धमकीची भाषा वापरण्यात आली आहे.

या धमकीबाबत श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सरकारनामा'शी बोलताना श्याम मानव म्हणाले, "मध्यप्रदेशातील बागेश्वरधामचे महाराज धीरेंद्र कृष्णशास्त्री यांना आव्हान दिल्यामुळेच आपल्याला ही धमकी आली आहे. धमकीसाठी दुसरे कुठलेच कारण नाही", असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, लोकांच्या मनातील भावना ओळखू शकतो, असा दावा धीरेंद्र महाराज यांनी नागपूर येथे केला होता. त्याला श्याम मानव यांनी आव्हान दिले. हा दावा सिद्ध करून दाखवला, तर ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली होती.

ही अंधश्रद्धा असल्याचे सांगत त्यांनी नागपूर पोलिसांत तक्रारही दिली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी धीरेंद्र महाराजांना क्लीन चिट दिली. 'अंनिस'च्या तक्रारीवरून साधी एनसीही दाखल करता येत नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT