IAS Pooja Khedkar Sarkarnama
पुणे

IAS Pooja Khedkar News : ...म्हणून आता खेडकरांच्या बंगल्यालाच पुणे महापालिकेची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

PMC Notice to IAS Pooja Khedkar Family : वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिमला प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसून येत आहेत. आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे महापालिकेने नोटीस बजावली आहे. महापालिकेकडून खेडकर यांच्या बंगल्यालालाच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटिस लावली आहे.

फुटपाथवरती साठ फूट लांब, तीन फूट रुंद आणि दोन फूट उंचीचे बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत पथविभागाकडून ही नोटीस देण्यात आली आहे. बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही नोटीस बंगल्याबाहेरील भिंतीवरती लावली आहे.

पुणे महापालिकेकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवरील करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत ही नोटीस असून हे अतिक्रमण तातडीने हटवण्याच्या सूचना या नोटिशीमध्ये करण्यात आली आहे. हे अतिक्रमण 7 दिवसात न हटवल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आला आहे. ऱ्या

वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिमला प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आली आहे. प्रोबेशनरी आयएएस अधिकारी खेडकर या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी केलेल्या 'प्रतापा'मुळे त्या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांनी आपल्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला होता.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर ताब्यात घेत त्यांचे सामान बाहेर काढले होते. आयएएस अधिकारी असतानाही त्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळत नसल्याने खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना कडक शब्दात समज देखील दिली होती. त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली होती.

त्यानंतर पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. पौड पोलिस स्टेशनला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांनी केला. याला शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा त्या 'बाउन्सर' घेऊन तिथे पोहोचल्या.

यावेळी मनोरमा खेडकर यांनी हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावले. याबाबत संबधित शेतकऱ्यांनी पौड पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली होती. पण, त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही.

याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर शुक्रवारी संध्यकाळी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंढरीनाथ कोंडिबा पासलकर, वय 65, रा. मु. पो. केडगाव,ता.दौंड) यांनी ही तक्रार दिली आहे.

याचबरोबर पुणे वाहतूक पोलिसांकडून देखील खेडकर यांच्या गाडीवर दंड करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे त्यानंतर आता महापालिकेने देखील नोटीस दिल्याने खेडकर कुटुंबांचे पाय आणखी खोलात गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT