Covid-19 Quarantine

 

Sarkarnama

पुणे

सावधान: 15 जानेवारीपर्यंत दुसरा डोस न घेतल्यास व्हावे लागणार क्वारंटाईन

पुण्यातील मावळ तालुक्यात लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांना क्वारंटाईन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी दिला आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : कोरोना (Covid-19) हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रार्दूभाव होताच सबंधित रुग्णाला क्वारंटाईन केले जाते. म्हणजे त्याला विलगीकरणात ठेवले जाते. पण, आता पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांनाही क्वारंटाईन (Quarantine) करण्याचा इशारा स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke)यांनी दिला आहे. त्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. १५ जानेवारीपर्यंत जे दुसरा डोस घेणार नाहीत, त्यांना क्वारंटाईन करणार असल्याचे शेळकेंनी शुक्रवारी (ता.४ जानेवारी) सांगितले. त्यामुळे दुसरा डोस घेण्याचे बाकी राहिलेले तीस टक्के पात्र रहिवासी तो घेतात का, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शेळके यांच्या या लसीच्या जबरदस्तीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी (ता.५ जानेवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना काहीसे समर्थन केले. राज्यात दीड कोटी लसीचे डोस पडून आहे. तरीही लोकं दुसरा डोस का घेत नाहीत, अशी विचारणा करीत पाटील यांनी शेळकेंच्या इशाऱ्याचे काहीसे समर्थनच केले. परदेशात दुसरा डोस घेणाऱ्यांना बक्षीस दिले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तिसऱ्या लाटेच्या तोंडावर ही लस व तिचे दोन्ही डोस घेतलेच पाहिजेत, असे ते म्हणाले. तरीही बळजबरी करून चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी शेळकेंची ही पैलवानी स्टाईल असल्याचे त्यांनी आपल्या अंदाजात सांगितले. त्यांची ती स्थिती लोकांनी निर्माण केली आहे. तीस टक्के लोकं कसे दुसऱ्या डोसशिवाय राहू शकतात, अशी विचारणा करीत तो घेतलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.

मावळ तालुक्यातील कोरोना आढावा बैठक काल (ता.४ जानावारी) शेळकेंनी घेतली. यावेळी प्रांत म्हणजे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधूसुदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, आऱोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, तालुका समन्वयक गणेश बुगाडे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील पहिल्या डोसची टक्केवारी ११४ टक्के असल्याबद्दल शेळकेंनी समाधान व्यक्त केले. मात्र, दुसरा डोस हा फक्त ७० टक्के जणांनीच घेतल्याचे समजताच त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दुसरा डोस न घेतलेल्यांना त्यांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे. १५ जानेवारीपर्यंत हा डोस घेतला नाही, तर सबंधितांना क्वारंटाईन करू, असा इशाराच त्यांना नाईलाजाने द्यावा लागला आहे, कारण कोरोनाने पुन्हा जोरदार उसळी घेतल्याने केंद्र सरकारने या साथीची तिसरी लाट आल्याचे जाहीर केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसर पुन्हा कोरोना व त्याच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा हॉटस्पॉट बनला आहे. परिणामी सरकारने पुन्हा कडक निर्बंध प्रशासनाने लागू केले आहेत. लॉकडाऊन लागण्याचीही भीती आहे. त्यामुळे हा दुसरा डोस देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यास शेळकेंनी प्रशासनास सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT