Ajit Gavhane, Ajit Pawar
Ajit Gavhane, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

अजित गव्हाणे एकाकी; अजितदादा आले की सगळे जमतात, पाठफिरताच पांगतात

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : पाच वर्षापूर्वीपर्यंत पक्षाचा बालेकिल्ला असलेले पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांची डबल इंजिनच्या सरकारविरुद्ध म्हणजे भाजपविरुद्ध सध्या एकाकी झुंज सुरु आहे. मात्र, त्यांना शहरातील ज्येष्ठ नेत्यांसह सर्वांची साथ मिळत नसल्याने राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असेपर्यंत पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी पुन्हा २०२२ च्या निवडणुकीत सत्तेत येईल, असे वाटत होते. पण, सत्तांतर झाल्याने ही वाट आता मोठी बिकट झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची १५ वर्षाची सत्ता घालवून २०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपची केंद्रासह आता राज्यातही सत्ता आल्याने हत्तीचे बळ आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकजुटीने लढा देण्याची गरज असताना त्याचाच अभाव उद्योगनगरीत राष्ट्रवादीत दिसून येत आहे.

नऊ महिन्यांपूर्वी (१२ फेब्रुवारी) शहराध्यक्षपदी आलेले गव्हाणे हे आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना पक्षातून एक टीम म्हणून अपेक्षित प्रतिसाद शहरात मिळत नसल्याचे चित्र आहे. अपवाद फक्त त्यांच्याबरोबर नियुक्ती झालेल्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट आणि युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांचा आहे. ते गव्हाणेंच्या प्रत्येक आंदोलनात दिसतात. पण, इतर पदाधिकारी त्यातही शहरातील पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील त्यात नसतात. ज्येष्ठ नेतेही त्याला अपवाद नाहीत. फक्त अजित पवार (Ajit Pawar) शहरात आले की झाडून ही सारी मंडळी स्टेजवर येतात. ते गेले की परत पांगतात.

ही अनिष्ट प्रथाच राष्ट्रवादीत शहरात पडली असून ती बदलण्याची गरज पक्षाच्याच एका जबाबदार पदाधिकाऱ्याने खासगीत व्यक्त केली. अन्यथा पुन्हा पालिकेत सत्ता येणे अवघड आहे, अशी कबुलीच त्यांनी दिली आहे. गव्हाणे हे एकटेच शहराचे कारभारी व भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर तुटून पडत आहेत. त्यांच्यावर टीकेची झोड उठवितात. गेल्या चार दिवसांत तीनदा त्यांनी लांडगेंवर हल्लाबोल केला आहे. पण, पक्षातील इतर नेत्यांची त्यात त्यांना साथ मिळत नाही, हे वास्तव आहे.

पालिकेची मुदत संपेपर्यंत सत्ताधारी भाजपविरुद्ध (BJP) गव्हाणेंच्या आंदोलनात तसेच इंधन दरवाढीविरोधातील केंद्र सरकारविरुद्धच्या त्यांच्या निदर्शनात भोसरी मतदारसंघातील पक्षाचे बहूतांश पदाधिकारी व कार्यकर्ते दिसलेत. शहरातील पिंपरी आणि चिंचवड या इतर दोन मतदारसंघातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्याला अपवाद राहिले आहेत.

राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमध्ये चार कार्याध्यक्ष, मुख्य प्रवक्ते आणि समन्वयक हे फक्त अजितदादा शहरात आले, की एकत्र दिसतात. ते गेले की पुन्हा पांगतात. पक्षाच्या आंदोलनालाही अनेकदा त्यांची दांडी असते. म्हणून पक्षाचे एकजिनसी आंदोलन दिसून येत नाही. नेते आणि गटात राष्ट्रवादी शहरात विभागली गेल्याचा हा परिणाम आहे. ते एकत्र ताकदीने लढले नाहीत, तर अजित गव्हाणेच काय, तर अजित पवारही काही करू शकणार नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT