Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येतांना दिसत आहे. गणेशोत्सवानंतरही रुग्ण संख्या न वाढता कमी होत असल्याने पिंपरी-चिंचवडकरांना व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. दररोज शंभरपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळणाऱ्या शहरात काल (ता.४ ऑक्टोबर) सलग तिसऱ्या दिवशी शंभरपेक्षा कमी रुग्ण आढळले. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या तोंडावर पिंपरी महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरातील रुग्णसंख्येसह कोरोना साथीने बळी जाणाऱ्यांची संख्याही झपाट्याने कमी होतांना दिसत आहे. सोमवारी (ता.४ ऑक्टोबर) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ५५ नवीन रुग्ण आढळले, तर उपचार घेत असलेल्या एकाचा रुग्णाचा मृत्यु झाला. रविवारी (ता.३ ऑक्टोबर) ८५ जणांना नव्याने कोरोनाचा प्रार्दुभाव झाला होता. एकही मृत्यु झाला नाही. तर, शुक्रवारी (ता.१ ऑक्टोबर) महिन्याच्या सुरूवातीला पहिल्यांदाच मोठ्या कालावधीनंतर रुग्णांचा आकडा शंभराच्या आत येण्यास सुरुवात झाली होती. तेव्हा ही संख्या ९९ वर आली. तसेच, यात एकही बळी गेला नाही. एकूणच दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे हे लक्षण आहे. महत्वाचे म्हणजे तिसऱ्या लाटेचे संकेतही अद्याप मिळालेले नसल्याने, गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीशी लढा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हेही वाचा :

पुण्यात अजूनही साडेतीन लाख पहिल्या तर १८ लाखजण दुसऱ्या लशीपासून वंचित

पुणे : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेतर्फे आज (ता.५ऑक्टोवर) सलग ७५ तास कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. शहरात अजूनही साडेतीन लाख जणांचा पहिला तर १८ लाख नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे. दरम्यान, लसीकरण गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूड येथील सुतार दवाखाना या दोन केंद्रांवर कोव्हीशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

देशभरात यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. यात विविध उपक्रम राबवले जात असताना लसीकरण मोहिमेला व्यापकता देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे शहरात सलग ७५ तास लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात गेल्या ९ महिन्यामध्ये ३० लाख नागरिकांचा पहिला डोस तर १५ लाख नागरिकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. अजूनही साडेतीन लाख जणांचा पहिला तर १८ लाख नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे. लसीकरण गतीने करून हे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, ‘‘ कमला नेहरू आणि सुतार दवाखान्यात ७५ तास लसीकरण केले जाणार आहे. यासाठी दोन्ही केंद्रावर प्रत्येकी डॉक्टरांसह १५ कर्मचारी असतील. तीन पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू राहील. प्रत्येक पाळीसाठी ५ जण असणार आहेत. या ठिकाणी कोव्हीशील्ड लसीचा व सिरिंजचा योग्यप्रमाणात पुरवठा केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका केंद्रावर ७५ तास लसीकरण मोहीम राबविली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने ८ केंद्र सुरू करणे अपेक्षित होते, मात्र, दोनच केंद्रावर ७५ तास लसीकरण केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT