सरकारनामा ब्यूरो
पुणे : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेतर्फे आज सलग ७५ तास कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. शहरात अजूनही साडेतीन लाख जणांचा पहिला तर १८ लाख नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे. दरम्यान, लसीकरण गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. (In Pune, three and a half lakh people are still deprived of the first vaccine and 18 lakh people are deprived of the second vaccine)
मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूड येथील सुतार दवाखाना या दोन केंद्रांवर कोव्हीशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.
देशभरात यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. यात विविध उपक्रम राबवले जात असताना लसीकरण मोहिमेला व्यापकता देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे शहरात सलग ७५ तास लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात गेल्या ९ महिन्यामध्ये ३० लाख नागरिकांचा पहिला डोस तर १५ लाख नागरिकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. अजूनही साडेतीन लाख जणांचा पहिला तर १८ लाख नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे. लसीकरण गतीने करून हे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, ‘‘ कमला नेहरू आणि सुतार दवाखान्यात ७५ तास लसीकरण केले जाणार आहे. यासाठी दोन्ही केंद्रावर प्रत्येकी डॉक्टरांसह १५ कर्मचारी असतील. तीन पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू राहील. प्रत्येक पाळीसाठी ५ जण असणार आहेत. या ठिकाणी कोव्हीशील्ड लसीचा व सिरिंजचा योग्यप्रमाणात पुरवठा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका केंद्रावर ७५ तास लसीकरण मोहीम राबविली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने ८ केंद्र सुरू करणे अपेक्षित होते, मात्र, दोनच केंद्रावर ७५ तास लसीकरण केले जाणार आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.