Vijay Shivtare, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Purandar Assembly Election: विधानसभेसाठी अजितदादांनी लोकसभेचा तह मोडला? महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार

Vijay Shivtare vs Ajit Pawar: पुरंदर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे यांचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असे असताना देखील या मतदारसंघातून अजित पवार यांनी आपला उमेदवार उतरवला आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संभाजी झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 31 Oct : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत विजय शिवतारे हे तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुरंदरमध्ये सभा घेत विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) 'यंदा बघतोस तू आमदार कसा होतो' असा इशारा दिला होता.

त्याप्रमाणे या निवडणुकीत विजय शिवतारे यांना पराभवाचा सामना देखील करावा लागला होता. त्यामुळे गेले काही वर्ष विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय वैर पाहायला मिळालं. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये तह झाला आणि हे दोन नेते एकत्र आले.

मात्र लोकसभेवेळी झालेला हा तह विधानसभा निवडणुकीत तुटतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण अजितदादांनी (Ajit Pawar) विजय शिवतारे यांच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार रिंगणात होत्या.

त्यांच्या उमेदवारीला विरोध करत शिंदेंच्या शिवसेनेत असलेले विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला होता. पवार कुटुंबाच्या विरोधात असलेली मतं आपल्याला पडणार आणि आपण या निवडणुकीत विजयी होणार असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला होता. यामुळे अजितदादांची डोकेदुखी वाढणार असं दिसत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये समेट घडवून आणली गेली.

त्यावेळी शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांचं काम करणार असल्याचं देखील सांगितलं. प्रत्यक्षात मात्र या निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांची पिछेहाट झाली तर सुप्रिया सुळे यांना तब्बल 35000 इतकं मताधिक्य या मतदारसंघातून मिळालं.

त्यामुळे आता हा तह मोडला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे यांचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असे असताना देखील या मतदारसंघातून अजित पवार यांनी आपला उमेदवार उतरवला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संभाजी झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्याला अजित पवारांनी एबी फॉर्म दिला असून आता आपण माघार घेणार नाही. आपल्या परीने आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं झेंडे यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे पुरंदर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का? तसं झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT