Wari, Crime News
Wari, Crime News  Sarkarnama
पुणे

वारीत चोरट्यांचा उच्छाद, २६ भाविकांचा लाखोंचा ऐवज केला लंपास

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : तुकोबारायांची वारी (Wari 2022) काल (ता. २१ जून) श्री क्षेत्र देहूतून पंढरपूरसाठी (Pandharpur) मार्गस्थ झाली. यावेळी मोठ्या संख्येने जमणाऱ्या वारकरी व भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांनी उठवला. काही तासांत त्यांनी अनेक महिलांचे दागिने हिसकावले. पुरुषांची पाकिटे मारली. तर, वारकऱ्यांच्या बॅगा पळवल्या आहेत.

त्याबाबत २६ गुन्हे दाखल झाले. त्यातही महिला भाविक दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील दागिने गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला चोरट्यांनी हिसकावल्याच्या घटना यावेळी अधिक घडल्या. या महिला चेनस्नॅचर तथा सोनसाखळीचोर या शहराबाहेरून नगर व नांदेड जिल्ह्यातून या चोरीसाठी आल्या होत्या. (Crime News)

चेनस्नॅचिंग (सोनसाखळी चोरी), पिकपॉकेटिंग (पाकिटमारी) आणि बॅग लिफ्टिंगचे (बॅगा चोरणे) २६ गुन्हे हे एकट्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वारीतील आहेत. कालच आळंदीतून प्रस्थान ठेवलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अशा घडलेल्या गुन्ह्यांचा त्यात समावेश नाही. दरवर्षीच चोरटे आपला हिसका या दोन्ही पालखी सोहळ्यात दाखवतात. आता, तर एकटेदुकटे नाही, तर त्यांनी त्यासाठी टोळ्या तयार केल्याचे दिसून आले. तसेच महिला भाविकांना महिला चोरट्या लक्ष्य करू लागल्या आहेत.

पोलिसांनी काल पकडलेली अशी एक चोरांची गॅंग, तर नगर जिल्यातील पाथर्डी येथून आल्याचे दिसून आले. त्यात एक महिला आहे. तिचे नाव पोलिसांनी दिले नाही. तर, सुनील दत्तू म्हस्के (वय २५), विलास हिरामण धोत्रे (वय २५), संतोष शहादेव म्हासळकर (वय २६), नागेश बारकू पवार (सर्व रा. पाथर्डी) अशी या इतर लुटारुंची नावे आहेत. या टोळीविरुद्ध जबरी चोरीचे दोन, तर दरोड्याचा एक असे तीन गुन्हे देहूरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आले आहेत. काल भरदिवसा त्यांनी वारीत हे गुन्हे केले. तर, दुसऱ्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन फरार आऱोपींत दोन महिला आहेत. त्यातील एक नांदेडची आहे, असे देहूरोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितले. २६ दाखल गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे लगेच उघडकीस आणल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, वारीमध्ये चोऱ्या तथा गुन्हे होऊ नयेत म्हणून पोलिसांनी ५६ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली होती. त्यात निम्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल ३१ महिला आहेत. त्यातून वारीमध्ये महिला चोरट्यांचा किती उपद्रव वाढला आहे, याची कल्पना येते. त्यापैकी एका महिलेचा समावेश असलेल्या पाचजणांच्या पाथर्डीच्या टोळीने, तर देहूगाव कमानीजवळ पालखीचे दर्शन घेत असलेल्या तीस वर्षीय तरुणीला गराडाच घातला. एवढेच नाही, तर तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील ७३ हजार रुपयांचे गंठण हिसकावले होते. या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

याच आरोपींनी याच म्हणजे तुकोबारायांच्या पालखीतच दुसऱ्या एका ४६ वर्षीय महिला भाविकाचे दोन तोळ्याचे गंठण हिसकावले होते. तर, त्यानंतर त्यांनी या पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या गणेश टिळेकर (वय ३३,रा. देहूगाव) यांचे पाकिटही मारले होते. त्यात ५३ हजार पाचशे रुपयांची रोकड होती. दोन महिला आणि रतन घनवट (वय २५,रा.चिखली) अशा तिघांच्या वारीतील दुसऱ्या लुटारु टोळीने आणखी एका ४२ वर्षीय महिलेचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला. ते, मात्र पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT