Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीला महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा नवा कारभारी होण्यासाठी इच्छुकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल 600 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कारखान्याची उद्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी आहे.
कोट्यावधींचे कर्ज असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या या कारखान्यावर 19 वर्ष सातत्याने विरोध करणारे कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याकडे पूढील पाच वर्षाची सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात पहिल्यांदा या निर्णयानेच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. पारंपारिक विरोधक असलेल्या विरोधकाला थेट सत्तेचे अवतण दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मात्र त्यानंतर छत्रपती कारखाना वाचला पाहिजे या भावनेतून आपण हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आणि कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन देखील केले. मात्र त्यानंतर विरोधक व सत्ताधारी एकत्र आल्याने विजयाची खात्री पक्की झाल्याने इच्छुकांची झुंबड उडाली.
7 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र शासकीय सुट्टीचे दिवस वगळता केवळ 5 दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. सोमवारपर्यंत तब्बल 261 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर शेवटच्या दिवशी 339 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीची एक महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे सहकारामध्ये निवडणुका लढवताना विद्यमान संचालक मंडळातील बहुतांश सदस्य पुन्हा निवडणूक लढवत असतात मात्र या वेळीच्या निवडणुकीमध्ये गेली दहा वर्ष संचालक मंडळात असणाऱ्या संचालकांना व त्यापूर्वीच्या पाच वर्ष संचालक असणाऱ्या माजी संचालकांना देखील उमेदवारी अर्ज भरू नका, असे थेट आदेश अजितदादांनी दिले होते.
त्यामुळे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असलेले प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह अनेक संचालकांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे फिरकले देखील नाही. मात्र अजित पवारांनी आवाहन करून देखील सात संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे याबाबत अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.