Pune News, 22 Jan : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत घड्याळाच्या चिन्हावर समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांनी पक्षातील कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतील बंडखोरांना बरोबर घेत आव्हान उभे केले आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 114 व पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 213 उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
तर अर्ज छाननी आणि माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे, असे असले तरी तालुक्यात खरी लढत ही घड्याळ विरुद्ध कमळ अशीच असणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवार (ता.21) रोजी अखेरचा दिवस होता. या दिवशी प्रशासकीय भवनाला जत्रेचे रूप आले होते.
इंदापूर तालुक्यात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मात्र, या निवडणुकीत दोघेही आपले जुने मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आणि 'घड्याळ' या एकाच चिन्हावर एकत्र आले आहेत.
या अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना आपल्या इच्छा आकांक्षावर पाणी सोडावे लागले. तर नेत्यांच्या मुलांची मात्र लॉटरी लागली आहे. यामुळे कार्यकत्यामध्ये कुठे उत्सुकता, संभ्रम आणि निराशा पहायला मिळाली.
एकेकाळी एकमेकांविरोधात आक्रमक राजकारण करणारे नेते आता एकत्र आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीसे बुचकळ्यात पडलेले दिसत असले, तरी नेत्यांच्या आदेशानुसार निवडणूक यंत्रणेत जोमाने सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे, इच्छुक उमेदवारी नाकारलेल्यांमध्ये तीव्र नाराजीचा फायदा भाजपने घेत त्यांना उमेदवारी दिली आहे. तर काहींनी आपल्या भूमिका गुपितच ठेवल्या आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीही या निवडणुकीच्या निमित्ताने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. यामध्ये सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रदीप गारटकर, भाजपचे युवा नेते प्रवीण माने, माजी आमदार यशवंत माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सर्व जागा ताकदीने लढवण्याच्या तयारीत उतरले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादीतील नाराज कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना आपल्याकडे घेण्याची भाजपने रणनीती यशस्वी ठरणार का ? हे पाहावे लागणार आहे. एकत्र आलेली राष्ट्रवादीची ताकद आणि सज्ज झालेली भाजपची फौज यामुळे इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.
इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांनी आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणले. यामध्ये राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी पुन्हा यापूर्वीच्याच बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून घड्याळ चिन्हावर अर्ज भरला.
तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे यांनी वडापुरी माळवाडी गटातून तर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी इंदापूर पंचायत समितीसाठी बोरी गणातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर निमगाव केतकी-शेळगाव गटातून बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव, काटी-लाखेवाडी गटातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, पळसदेव-बिजवडी गटातून हर्षदा दीपक जाधव, बोरी-वालचंदनगर गटातून सागर मिसाळ यांनी तर माळवाडी गणातून कल्पना विष्णू पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भिगवण–शेटफळगढे (सर्वसाधारण महिला) – (16),पळसदेव–बिजवडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) –(5), माळवाडी-वडापुरी गट (सर्वसाधारण) – (21),निमगांव केतकी–शेळगाव गट (सर्वसाधारण महिला) – (11), बोरी –वालचंदनगर गट (अनुसूचित जाती महिला) – (11), लासुर्णे –सणसर गट (अनुसूचित जाती महिला) – (16),काटी –लाखेवाडी गट (सर्वसाधारण) – (19),बावडा –लुमेवाडी (सर्वसाधारण महिला) – (15)
इंदापूर पंचायत समिती गण व आरक्षण व दाखल झालेले अर्ज
भिगवण : सर्वसाधारण महिला – (9),
शेटफळगढे: सर्वसाधारण – (23),
पळसदेव: सर्वसाधारण महिला – (9),
बिजवडी: नागरिकांचा मागास प्रवर्ग –(11),
माळवाडी: सर्वसाधारण महिला – (17),
वडापुरी: सर्वसाधारण महिला – (10),
निमगाव केतकी: नागरिकांचा मागास प्रवर्ग–(11),
शेळगाव: सर्वसाधारण – (23),
बोरी: सर्वसाधारण – (14)
वालचंदनगर:
अनुसूचित जाती महिला - (9),
लासुर्णे : अनुसूचित जाती – (24),
सणसर: अनुसूचित जाती महिला –(15)
काटी: सर्वसाधारण – (10)
लाखेवाडी: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – (8)
बावडा: नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला – (7)
लुमेवाडी: सर्वसाधारण – (13)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.