पुणे

मोजायची सवय असल्यानेच चंद्रकांतदादा आकड्यात बोलतात : जयंत पाटलांची टीका

सरकारनामा ब्युरो

पुणे : मावळमधून पार्थ पवार यांना पक्षातील सर्व नेत्यांच्या संमतीने उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे पार्थ यांना उमेदवारी दिली नसती तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण केले असते, हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप खोटा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे सांगितले. चंद्रकांत पाटील यांना मोजायची सवय असल्याने ते आकड्यांत बोलतात, असा चिमटाही त्यांनी काढला. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच ते सहा आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटलांना सतत मोजण्याची सवय आहे. त्यामुळे ते सतत आकड्यात बोलतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीनिमित्त पुण्यात आलेल्या पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे उपस्थित होते. राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. सल्लागाराच्या भरवशावर शिवसेना राजकारण करीत असल्याचा टोला पाटील यांनी यावेळी लगावला. मुंबईतील शिवसैनिकांना पीकविम्यातून काय मिळते, हेही ठाऊक नसेल; पण त्यांनी मोर्चा काढला, याकडे लक्ष वेधत पाटील यांनी मोर्चाची खिल्ली उडविली. 

पाटील म्हणाले, "भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होते. मात्र, त्याचा अहवाल दिला जात नाही. तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तरुणांची फसवणूक केली आहे. या सरकारच्या योजना फसव्या आहेत. लोकांचा विचार न करता सरकार केवळ आपला अजेंडा रेटत आहे. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मते देत आहेत. विधानसभा निवडणुकीत तसे होणार नाही. या सरकारबाबत लोकांच्या मनात चीड आहे.'' 

दरम्यान, पुण्यातून शहराध्यक्ष तुपे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली नसली, तरी त्यांना गरजेनुसार लढण्याचा आदेश दिला जाईल. मात्र ते पक्षात नाराज नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT