Atul Benke
Atul Benke Sarkarnama
पुणे

बिबट सफारीसाठी मी सर्वस्व पणाला लावलंय : आमदार अतुल बेनकेंनी ठणकावले

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : जुन्नरची बिबट सफारी बारामतीला गेली, हा माजी आमदारांनी केलेला राजकीय स्टंट आहे. या प्रकरणाला ‘ध’ चा ‘मा’ असे स्वरुप देऊन संभ्रम निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी मी व खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) जबाबदारीने काम करत असून तालुक्यात बिबट सफारी करण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावले आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी दिली. (Junnar's Bibat safari goes to Baramati, this is former MLA's political stunt : Atul Benke)

‘जुन्नरची बिबट सफारी बारामतीला गेली’ या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वाक्याने वातावरण ढवळून निघाले आहे. या बाबत पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बिबट सफारची खरी वस्तुस्थिती काय आहे. या बाबत माहिती देण्यासाठी आमदार बेनके यांनी कांदळी औद्योगिक वसाहत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, सभापती विशाल तांबे, विजय कुऱ्हाडे, पापा खोत, पर्यटन संस्थेचे विजय कोल्हे, जय म्हस्करे, विनायक खोत, जितेंद्र बिडवई, शेखर नलावडे, अशोक घोडके आदींसह वन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आमदार बेनके म्हणाले की, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या कार्यकाळात २०१६ ते २०१७ दरम्यान बिबट सफारीसाठीचा डीपीआर व सर्व्हे झाला होता. मात्र, आंबेगव्हाण हे ठिकाण बिबट्यासाठी पोषक असले तरी भोगोलिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी रस्ते करणे अवघड असल्यामुळे बिबट सफारी प्रोजेक्टला मंजुरी मिळाली नाही. बिबट सफारीसाठी मी कटीबद्ध असून तालुक्यातील इतर ठिकाणी सर्वे करण्याचे काम चालू आहे. बिबट सफारीचा प्रश्न मी अधिवेशनात उपस्थित केला आहे. बारामतीमधून प्रोजेक्टसाठी प्रस्ताव होता, त्यानुसार त्या ठिकाणी प्रोजेक्टला मंजुरी मिळाली. याचा अर्थ जुन्नरची बिबट सफारी बारामतीला गेली, असे नाही.

जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून त्याला राजकीय रंग दिला जात आहे. या मुद्द्यावरून जुन्नर तालुक्यात वाढत चाललेल्या जनप्रक्षोभामुळे बारामती येथील बिबट सफारी प्रोजेक्टला तूर्त स्थगिती दिली आहे. मुख्य वनसंरक्षक राहुल पाटील याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत. माजी आमदार सोनवणे यांनी हवेत न बोलता व्यवस्थित तांत्रिक माहिती घेणे गरजेचे आहे. पर्यटन संस्थेचे पदाधिकारी यांना घेऊन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे. या बैठकीला सोनवणे यांनी यावे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. माझा माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. सोनवणे यांचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास असेल तर त्यांनी उपोषण न करता बिबट सफारीसाठी एकत्रित काम करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन बेनके यांनी या वेळी केले.

आम्ही जबाबदारीने काम करणारे : बेनके

जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आम्ही जबाबदारीने काम करत आहोत. येडगाव येथील यशवंतराव चव्हाण पर्यटन स्थळासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गड संवर्धन, शंभर कोटी रुपये खर्चाची शिवसृष्टी, ५० कोटी रुपये खर्चाच्या हिवरे येथील डॉ. अलेक्झांडर गिब्सन बोटॅनिकल गार्डनचा प्रोजेक्ट रिपोर्ट व डीपीआर तयार झाला आहे. मंदारणे येथे माउंटरी इन्स्टिट्यूटचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही आमदार अतुल बेनके यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन व नियोजन अतुल कुलकर्णी, तुषार पडवळ यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT